जनलोकपाल व "लोकायुक्त'साठी पुन्हा जंतरमंतर गाठणार - अण्णा हजारे

डॉ. बाळ ज. बोठे पाटील
गुरुवार, 15 जून 2017

नगर - लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याचे कारण पुढे करीत केंद्र सरकारने जनलोकपाल विधेयकासंदर्भात जाणीवपूर्वक टाळाटाळ चालविली आहे. राज्यांनी करायच्या लोकायुक्त नेमणुकीसंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक नाहीत. जनलोकपाल व लोकायुक्त अस्तित्वात आले तर सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन आपले अधिकार कमी होतील, ही भीती राज्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे 'जनलोकपाल'साठी लवकरच दिल्लीत "जंतरमंतर' गाठावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दिला.
हजारे उद्या (ता. 15) 80 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला.

हजारे म्हणाले, 'जनलोकपालचा विषय टाळण्यासाठी सरकारने विविध क्‍लृप्त्या केल्या; राज्यांनी नेमायच्या लोकायुक्त पदाबाबतही केंद्राची अनास्था कायम आहे. किमान भाजपचे सरकार असलेल्या राज्यांत तरी लोकायुक्त नेमणे अपेक्षित होते. परंतु मोदी व इतर राज्यकर्त्यांना सत्तेचे विकेंद्रीकरण नको आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करून ते यशस्वी करून दाखविले. मात्र, त्याचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी चालविलेली केविलवाणी धडपड भूषणावह नाही. कारखानदार त्यांच्या मालाची किंमत स्वतः ठरवितात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाची किंमत ठरविता आली पाहिजे. त्यासाठी केंद्राने स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होईल. परिणामी सरकारला कर्जमाफीसारख्या खर्चिक व तात्पुरत्या मलमपट्टीची उपाययोजना करण्याची गरजही पडणार नाही.''

'सरकारने अस्तित्वात आणलेल्या ग्रामरक्षक दल कायद्याच्या आधारे गावागावात स्थापन होणारे ग्रामरक्षक दल हे गावच्या सामाजिक आरोग्याला पोषक ठरणार आहे,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला,
...तरच युवक समाज व देश घडवतील

'मी अवघा 25 वर्षांचा असताना गाव, समाज व देशाच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. 80 वर्षांच्या आयुष्यात निष्कलंक राहिलो. पैसा व सत्तेच्या मागे लागलो नाही. त्यामुळेच कोणतेही पद नसताना माहितीचा अधिकार, ग्रामसभेचे अधिकार, बदल्यांचा कायदा, दफ्तर दिरंगाईचा कायदा असे वीस समाजोपयोगी कायदे करण्यास सरकारला भाग पाडू शकलो. आताच्या युवकांमध्ये मात्र राजकीय पदाशिवाय समाजसेवा करता येत नाही, असा समज आहे. स्वच्छ चारित्र्य व प्रामाणिकपणाचा अंगिकार केल्यास हे तरूणच समाज व देश घडवू शकतील,'' असा संदेश हजारे यांनी तरुण पिढीला दिला.

Web Title: nagar news anna hazare agitation for janlokpan & lokayukta