हा महाराष्ट्र आहे की यूपी ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नगर - ‘‘आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दोन-अडीचशे जण पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करतात. अशी घटना महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती. हा महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश?,’’ असा प्रश्‍न राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज उपस्थित केला. गृहमंत्रिपदी असणारे मुख्यमंत्रीच या घटनेला जबाबदार आहेत आणि पोलिसांच्या संगनमताने ही गुंडगिरी सुरू आहे, असा आरोपही  त्यांनी केला.

शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची काल (ता. ७) हत्या झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे येऊन माहिती घेतली. अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांची भेट घेऊन चर्चा केली. कदम म्हणाले, ‘‘आम्ही या हत्येचा धिक्‍कार करतो. भाजप, ‘राष्ट्रवादी’ व काँग्रेसच्या संगनमताने हा प्रकार  घडला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. निवडणूक असताना आमदार संग्राम जगताप गुंडांसह बूथवर येऊन शिवसैनिकांना शिवीगाळ करीत होते. त्या वेळी पोलिसांना माहिती दिली तरीही कारवाई होत नव्हती. गुंडांची हिंमत पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच वाढली. हत्या झालेल्या दोन्ही शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना घेईल.’’

‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद
संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येच्या निषेधासाठी आज शहर व जिल्ह्याच्या काही भागात ‘बंद’ पाळण्यात आला. शहरात ‘बंद’ला मोठा आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘बंद’चे आवाहन करण्यासाठी शिवसेनेतर्फे शहरातून सकाळी मार्च काढण्यात आला. आज सकाळपासूनच शहरात सर्वत्र सामसूम होती.  

नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे त्यांची मुजोरी वाढते. जिल्ह्यात बेकायदा शस्त्रसाठा, वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. राजकारणात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. राज्याला सक्षम व स्वतंत्र गृहमंत्री आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांचा या पदासाठी अट्टहास का?
- राधाकृष्ण विखे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

Web Title: nagar news Sanjay Kotkar Vasant Thube murder case shivsena