'टू जी'प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

नागपूर - 'टू जी' प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला; मात्र सरकार कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. महालेखाकारने (कॅग) "पराचा कावळा' करून कॉंग्रेसची प्रतिमा मलिन केली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेस आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरातील कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

"कॅग'ने "टू जी' स्पेक्‍ट्रम वाटप प्रकरणात एक लाख 72 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला. भाजपने हा देशातील मोठा गैरव्यवहार असल्याचे रान पेटवले; मात्र एकही पुरावा सादर न केल्याने न्यायालयाने सर्वांना दोषमुक्त केले. मणिशंकर अय्यर यांच्यावर मोदींची सुपारी दिल्याचा आरोप करण्याबाबत पुरावा सादर करावा; अन्यथा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. आरोप केल्यास त्याचा पुरावा देण्याची जबाबदारीही आरोपकर्त्यांची आहे, असेही चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेसचे झालेले नुकसान न भरून निघण्यासारखे आहे, असेही चव्हाण म्हणाले.

"पाकिस्तानचे दूतावास बंद करा'
सर्वच देशांतील मंत्र्यांशी बोलावे लागते. त्यामुळे पाकिस्तानच्या मंत्र्यांशी बोलण्यात गैर नाही. बोलणे गैर असेल, तर पाकिस्तानसोबत बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा कायदा करायवा हवा. त्यांचे दूतावासदेखील बंद करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

अफवांचे सुवर्णपदक "आरएसएस'ला
अफवा पसरविण्यात "आरएसएस'चे स्वयंसेवक तरबेज आहेत. सोशल मीडियाचा ते चांगला वापर करतात. अफवा पसविण्याचे सुवर्णपदक असते, तर ते नक्की "आरएसएस'ला मिळाले असते, अशी खोचक टिप्पणी चव्हाण यांनी केली. दाभोळकर हत्येच्या आधीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता; मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: nagpur maharashtra news PM to apologize demand for 2G