साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नागपूर - बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला. 

नागपूर - बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला. 

साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मते; तर डॉ. शोभणे यांना 357 मते मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून देशमुख आणि शोभणे यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले होते. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पाठीशी मराठवाडा, तर शोभणेंच्या पाठीशी विदर्भ होता. याव्यतिरिक्त दोघांनीही मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील मते मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यात बडोद्यातील आयोजक संस्थेची मतेही दोघांना विभागून मिळाली असावी, असा अंदाज आहे; पण पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश मते देशमुखांना मिळाल्यामुळे विजय सोपा झाला, असे बोलले जात आहे. 

मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. मकरंद अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात सकाळी 9.30 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीपासून लक्ष्मीकांत देशमुख आघाडीवर होते. पहिल्या फेरीअखेर देशमुख आणि शोभणे यांच्यात जवळपास ऐंशी मतांचा फरक होता. विजयासाठी 434 मतांचा कोटा आवश्‍यक होता; पण पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत कुणालाही तो पूर्ण करता आला नाही, त्यामुळे चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रिया लांबली. चौथ्या फेरीअखेरही 434 पर्यंत कुणालाही मजल मारता आली नाही. त्यामुळे सर्वाधिक 427 मते मिळविणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले. यापूर्वी दोन वेळा नशीब आजमावणारे कथाकार राजन खान यांना दोन्ही वेळा दोनअंकी मतेदेखील मिळविता आली नव्हती. मात्र या निवडणुकीत त्यांनी 123 मतांपर्यंत मजल मारली. 

एकूण मतदार - 1073 
प्राप्त मतपत्रिका - 896 
अवैध मते - 29 
वैध मते - 867 

 

लक्ष्मीकांत देशमुख - 427 
डॉ. रवींद्र शोभणे - 357 
राजन खान - 123 
डॉ. किशोर सानप - 47 
रवींद्र गुर्जर - 41 

आनंद अन्‌ ओझेही 
""प्रशासक या नात्याने समाजातील प्रश्‍न समजून घेत आलो आणि लेखक या नात्याने ते मांडत, सोडवत आलो. हे लक्षात घेऊन मतदारांनी दिलेला कौल मी नम्रपणाने स्वीकारतो. बडोद्यात पूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न. चिं. केळकर होते. याचे समाधान आहे आणि एक प्रकारचे ओझेही आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाला शोभेल असेच काम करेन. बालमजुरी, दहशतवाद, स्त्रीभ्रूणहत्या, भ्रष्टाचार, काश्‍मीर प्रश्‍न असे "लोकल ते ग्लोबल' प्रश्‍न मांडत आलो. यापुढेही ते मांडत राहीन.'' 
- लक्ष्मीकांत देशमुख (नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष) 

आक्षेप नाही आश्‍चर्य आहे 
""संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत माझा काहीही आक्षेप नाही; पण निकालाबाबत आश्‍चर्य आहे. प्रचाराच्या निमित्ताने मी जेवढा फिरलो, जेवढ्या मतदारांना-वाचकांना भेटलो, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आणि माझ्या आजवरील कामाच्या तुलनेने मला मिळालेली मते फारच कमी आहेत. ती पाहून मलासुद्धा धक्का बसला. निवडून आलेल्या उमेदवाराला माझ्या शुभेच्छा आहेत.'' 
- रवींद्र गुर्जर (साहित्यिक) 

माणसं कळली 
निवडून आलेल्या उमेदवाराचे अभिनंदन आणि निवडून न आलेल्या इतरही उमेदवारांचे अभिनंदनच करतो. जे जे मी समाजासमोर कबूल केले ते ते सर्व लवकरच पूर्ण करणार आहे. मी काहीही गमावले नाही. उलट अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आत्मबळ मी कमावले आहे. मला अंतर्बाह्य माणसं कळली. माणसं कळणं आणि वळणं हेच प्रतिभावंताचं धन आहे. तेच मी व्रतस्थपणे माझ्या लेखनातून मांडणार आहे. 
- किशोर सानप (साहित्यिक) 

जिल्हाधिकारी नव्हतो म्हणून... 
मी माझ्या पद्धतीने काम केले आणि त्याची पावती म्हणून मला ही मते मिळाली. विजयासाठी आवश्‍यक असलेला कोटा पूर्ण न करता निवडून येणारा अध्यक्ष खरा तर विजयी नसतोच. गेल्या तीस वर्षांमध्ये कोटा पूर्ण न करता निवडून येत अध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साहित्यसृष्टीने नीरक्षीर न्यायाने या घटनेकडे बघावे आणि गुणात्मकतेची कशी वाढ होईल, याचा विचार करावा. शेवटी मी जिल्हाधिकारी नाही आणि कधी नव्हतोही, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 
- डॉ. रवींद्र शोभणे 

महामंडळातर्फे अभिनंदन 
लक्ष्मीकांत देशमुख यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित होताच महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: nagpur news Laxmikant Deshmukh Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan