पोल्ट्री व्यावसायिकांनो ही बातमी तुमच्यासाठी; ‘बर्ड फ्लू’साठी अशी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री

विनोद इंगोले
Tuesday, 26 January 2021

सुधारित कृती आराखड्यानुसार एक किलोमीटर परिघातील कुक्‍कुट पक्षी, त्यांची अंडी व पक्षी खाद्य नष्ट करावे लागतात. त्यानुसार परभणी, लातूर या दोन जिल्ह्यांत अशाप्रकारची कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या संदर्भाने प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री केदार यांनी सांगीतले.

नागपूर : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून बाधित पक्ष्यांची शास्त्रोक्‍त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे नुकसान होणाऱ्या पशुपालकांसह शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्‍के निधीतून यासाठी तरतूद केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांत कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रकार समोर आले होते. प्रयोगशाळेत चाचणीअंती एव्हिएन इन्फुएन्झामुळे (बर्ड फ्लू) बाधित झाल्याने या कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. केंद्र शासनाने २०२१ मध्ये बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत.

जाणून घ्या - डॉक्‍टरचे वेळकाढू धोरण! बाळाच्या गळ्याभोवती नाळ आल्याचे सांगून केले रेफर; मग घटला हा प्रकार

सुधारित कृती आराखड्यानुसार एक किलोमीटर परिघातील कुक्‍कुट पक्षी, त्यांची अंडी व पक्षी खाद्य नष्ट करावे लागतात. त्यानुसार परभणी, लातूर या दोन जिल्ह्यांत अशाप्रकारची कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या संदर्भाने प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री केदार यांनी सांगीतले.

पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने पशुपालक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांना अल्पसा आधार म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून प्रत्येकी ५० टक्‍के प्रमाणे निधीची तरतूद करीत भरपाई देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश बुधवारी (ता. २०) काढण्यात आले. त्यामुळे बाधित क्षेत्रातील पशुपालकांना अल्पसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

अशी मिळणार मदत

 • आठ आठवड्यापर्यंतचे अंडी देणारे पक्षी - २० रुपये
 • आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी - ९० रुपये
 • सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्‍कुट पक्षी - ७० रुपये
 • अंडी - ३ रुपये
 • पक्षी खाद्य - १२ रुपये प्रती किलो
 • सहा आठवड्यापर्यंतचे बदक - ३५ रुपये
 • सहा आठवड्यांवरील बदक - १३५ रुपये
 • सहा आठवड्यापर्यंतचे हंस - ३५ रुपये
 • सहा आठवड्यांवरील हंस - १३५ रुपये
 • सहा आठवड्यांवरील गिनी फाऊल - १३५ रुपये
 • सहा आठवड्यांपर्यंतचे गिनी फाऊल - २० रुपये
 • सहा आठवड्यांपर्यंतचे टर्की - ६० रुपये
 • सहा आठवड्यांवरील टर्की - १६० रुपये

जाणून घ्या - Success Story : आईने अंगावरील सोनं गहाण ठेवून शिकवले पोरीला अन् तिने कमालच केली

स्वतः बक्षीस देण्यास तयार
शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय ग्रामीण भागात होतो. अफवांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बर्ड फलूमुळे कोणताही व्यक्‍ती दगावल्याचे सिध्द केल्यास स्वतः त्याला बक्षीस देण्यास तयार आहे. परिणामी उकळलेले चिकन व अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. तरी सुध्दा प्रादुर्भावग्रस्त भागासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.
- सुनील केदार, 
मंत्री पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur news Suneel Kadar said Poultry traders will get help