Namo Drone Didi Scheme : निकृष्ट बॅटरीमुळे ‘ड्रोन दीदी’ नाराज; लाभार्थींनी केली नाराजी व्यक्त

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम आणि रोजगाराभिमुख करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमो ड्रोन दीदी’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.
namo drone didi scheme
namo drone didi schemesakal
Updated on

मुंबई - बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम आणि रोजगाराभिमुख करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमो ड्रोन दीदी’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. यातून राज्यातील ६० बचत गटांना ड्रोन देण्यात आले. यातील एकूण १७ बचत गटांना चेन्नईतील गरुडा एअरोस्पेस कंपनीचे ड्रोन वाटप करण्यात आले. मात्र या बहुतांश ड्रोनची बॅटरी निकृष्ट असल्याने लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे.

ड्रोनच्या बॅटरीत वारंवार बिघाड होतो. पण राज्यात कंपनीचे सेवा केंद्र नाही. तसेच कंपनीच्या चेन्नईतील कार्यालयात संपर्क केल्यास त्याठिकाणी भाषेची अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींनी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘नमो ड्रोन दीदी’ या योजनेची घोषणा केली.

त्यानुसार २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत देशभरातील महिला बचत गटांना १५ हजार ड्रोन वितरण करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने एक हजार २६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत २०२३-२४ या कालावधीत देशातील आघाडीच्या खत कंपन्यांना त्यांच्या खर्चाने महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्याचा आदेश देण्यात आला.

त्यानुसार २३- २४ या आर्थिक वर्षात एकूण एक हजार ९४ ड्रोनचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात ६० ड्रोनचे वितरण झाले असून, यातील १७ ड्रोन हे राष्ट्रीय रसायन आणि खते (आरएफसी) या कंपनीने बचत गटांना पुरविले आहेत. चेन्नईतील गरुडा कंपनीकडून हे ड्रोन खरेदी केले आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘नमो ड्रोन दीदी’ पोर्टल तयार केले आहे. मात्र या योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या बचत गटांची माहिती दिलेली नाही. राज्यात ड्रोन सेवा केंद्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वेळ व पैसा वाया

‘आरसीएफ’ ने बचत गटांना ड्रोन पुरविण्यापूर्वी ते चालविण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. पण त्यानंतर ड्रोन वापरण्याचे प्रात्यक्षिक देण्यास कंपनीकडून विलंब झाला. त्याचबरोबर प्रत्यक्ष वापर करत असताना ड्रोनची बॅटरी लवकर संपत असल्याचा अनुभव अनेकींना आला आहे.

जादा बॅटरी नसल्याने नादुरुस्त बॅटरी वारंवार चार्ज करण्यासाठी घरी जाणे आणि पुन्हा फवारणीसाठी शेतात येणे शक्य होत नाही. तसेच ड्रोनमध्ये काही बिघाड झाल्यास वेळेत दुरुस्ती होत नसून मी वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने, ड्रोन दीदींनी नाराजी व्यक्त केली आहे.

बऱ्याच ड्रोन दीदी चांगले काम करत आहेत. मात्र काहींनी ड्रोन वापरताना खराब केले आहेत. ड्रोनच्या बॅटरीसह काही अडचणी जरूर आहेत. कंपनीशी संपर्क करताना अडचणी येतात, हे खरे आहे. यासाठी गटांनीही जादाच्या बॅटरी खरेदी घेणे आवश्यक आहे

- संदीप केसरकर, वरिष्ठ अधिकारी, आरसीएफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com