Adani row : अदानींच्या चौकशीला सरकार का घाबरते; नाना पटोले | Nana Patole over adani group controversy congress protest share market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani row

Adani row : अदानींच्या चौकशीला सरकार का घाबरते; नाना पटोले

मुंबई : ‘‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले असून अब्जावधी रुपयांचा महागैरव्यवहार झाला असताना मोदी सरकार अदानी यांच्या चौकशीला का घाबरत आहे का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेसच्या वतीने सोमवारी राज्यभरात अदानींच्या विरोधात एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन करण्यात आले. पटोले पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या ‘घनिष्ठ संबंधा’वर बोलत होते. अदानींचा फुगा फुटेल, असेही राहुल यांनी सांगितले होते.

उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानींच्या कंपनीत बेकायदा गुंतवला. त्याचे परिणाम देशाला व गुंतवणुकदारांना भोगावे लागत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पुण्यातील टिळक चौकातील एलआयसी कार्यालयाजवळील आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘काँग्रेससह इतर विरोधी पक्ष तीन दिवसांपासून संसदेत अदानी यांच्या गैरकारभारावर चर्चा करण्याची मागणी करीत आहेत. पण मोदींचे हुकूमशाही सरकार चर्चा करत नाही. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.

आजही काँग्रेस पक्षाने जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करावी यासाठी राज्यभर आंदोलन केले. अदानी यांच्या गैरकारभाराची चौकशी होईपर्यंत व जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही,’’ असेही पटोले म्हणाले.

विविध शहरांत आंदोलने

ठाणे शहरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अमरावती येथे शहर जिल्हाध्यक्ष बबलू शेखावत व ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, कल्याण येथे सरचिटणीस ब्रिज दत्त व जिल्हाध्यक्ष सचिन पोटे,

कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे व विशाल मुत्तेमवार, नाशिमध्ये शहराध्यक्ष शरद आहेर, उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, खामगाव येथे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एलआयसी व एसबीआयच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.