'शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला राणे दिला'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई - मी आज जो काही आहे तो दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. बाळासाहेबांनी जो विश्‍वास टाकला तसा कोणताही नेता टाकणार नाही. बाळासाहेबांनीच महाराष्ट्राला राणे दिला, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त केली. 

मुंबई - मी आज जो काही आहे तो दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. बाळासाहेबांनी जो विश्‍वास टाकला तसा कोणताही नेता टाकणार नाही. बाळासाहेबांनीच महाराष्ट्राला राणे दिला, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त केली. 

राणे यांच्या पासष्ठीनिमित्त त्यांचा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आदी या वेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ""राजकीय वारसा नसतानाही राणे यांनी राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. आकस न बाळगता सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. मी त्यांच्या बऱ्याच गोष्टींचा साक्षीदार आहे. राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर आजचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते.'' गडकरी यांनी या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनाही चिमटा काढला. कॉंग्रेसमध्ये हायकमांड हसली की आपल्याला हसावे लागते. शिंदे यांना हे माहीत आहे, असे ते म्हणाले. राणे यांनीही या वेळी गडकरींवर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, ""विरोधी पक्षातील नेत्यांसोबत बसताना काहींची घाबरगुंडी उडते. गडकरींना तशी भीती वाटत नाही. पद धोक्‍यात घालून मैत्री निभावणे हे केवळ गडकरींनाच जमते. 

"मी शिवसेनेत असताना विलासराव देशमुख यांचे सरकार आम्ही पाडणार होतो; पण आमच्यातील काहींना ते आवडले नाही. अखेर शिंदे यांचे नाव पुढे येताच सरकार न पाडण्याचे आम्ही निश्‍चित केले, ही आठवण राणे यांनी सांगितली. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांची आठवण येत असल्याचेही राणेंनी या वेळी नमूद केले. 

राणे चुकीचा विचार करणार नाहीत : सुशीलकुमार शिंदे 
मी मुख्यमंत्री असताना राणे आणि गडकरी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी मला चांगलेच छळले. राणे हे विचार करून काम करणारे द्रष्टे नेते आहेत. त्यांच्याकडे शब्दांची तलवार आहे. ते समोरच्याला शब्दांच्या जोरावर घायाळ करतात, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. राणे कॉंग्रेसच्या परीक्षेत खरे उतरले आहेत. ते चुकीचा विचार कधीच करणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

घटवलेले वजन... सूट आणि अर्थसंकल्प : जयंत पाटील 
अर्थमंत्री असताना मी बरेचसे वजन कमी केले. अर्थसंकल्प मांडण्यासाठी माझ्याकडे नीट बसणारे कपडे नव्हते. राणेंना याबाबत समजताच त्यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला माझ्या घरी शिंपी पाठवला. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता नवा ड्रेसही शिवून दिला. तो घालून मी अर्थसंकल्प मांडला, असा किस्सा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या वेळी सांगितला.

Web Title: Narayan rane celebrate 65th birthday