हत्येचे पिस्तूल सापडले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे छापा घालून पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, मॅगझिन, खंजीर व तलवार जप्त केली. या पिस्तुलाच्या साहाय्याने दाभोलकरांची हत्या करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. दरम्यान, याप्रकरणी शुभम सुलारे, अजिंक्‍य सुलारे, रोहित रेगे या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

पत्रकार गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये या पिस्तुलाचा वापर करण्यात आला का? याबाबतची बॅलेस्टिक चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. गौरी लंकेश प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने रोहित रेगेकडे हे गावठी पिस्तूल लपविण्यासाठी दिल्याचा संशय आहे. हे पिस्तूल पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी सचिन अंदुरे याच्या दोन नातेवाइकांकडेही सीबीआयने चौकशी केली. त्यात अंदुरेचा मेहुणा शुभम सुलारे, चुलत मेहुणा अजिंक्‍य सुलारे यांच्यासह धावणी मोहल्ल्यातील रोहित रेगे यांचा समावेश आहे. सीबीआयने एटीएसकडे औरंगाबादमध्ये कारवाई करण्यासाठी मदत मागितली आणि त्यानुसार, एटीएस व सीबीआयने संयुक्त कारवाई करत पिस्तूल ताब्यात घेतले. या कारवाईत सापडलेले पिस्तूल दाभोलकर हत्येसाठी वापरल्याचा दाट संशय आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी पिस्तूलची बॅलिस्टिक चाचणी करण्यात येणार आहे. 

कोड होत आहेत डीकोड
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी एकमेकांसोबत सांकेतिक भाषेच्या साहाय्याने एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे एटीएस सध्या त्यांचे कोड डीकोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आरोपींनी राऊतसाठी पांडेजी, बॉम्बसाठी लाडू यांसारख्या कोडचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींची संघटित गुन्हेगारी टोळीसारखी संघटना होती. त्यात विविध शाखा होत्या. त्यात एका गटावर दिलेल्या जबाबदारीची माहिती दुसऱ्या गटातील व्यक्तीला नसायची.

Web Title: Narendra Dabholkar murder case Murder pistol