भारतीय अर्थव्यवस्थेचे हिरोशिमा, नागासाकी केले- शिवसेना

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

उद्योग जगताच्या ‘असोचेम’ या संघटनेने तर काल सांगून टाकले, नोटांबदीनंतर देशात ४० लाख नोकऱया आतापर्यंत गेल्या व आणखी जातील. म्हणजे देशाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटते. जनतेच्या जीवनाची शाश्वती उरली नाही हे स्पष्ट दिसत असल्यानेच आम्ही हे एका तळमळीने बोलत आहोत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कुणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचेही ऐकले नाही. मंत्रिमंडळात ज्याप्रमाणे मुके-बहिरे पोपट बसवले आहेत त्या धर्तीचेच गव्हर्नर रिझर्व्ह बँकेवर नेमून देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून टाकली आहे. नोटाबंदीचा अणुबॉम्ब टाकून मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे हिरोशिमा, नागासाकी केले, अशी जोरदार टीका शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर केली.

मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर सतत विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. या निर्णयावरून शिवसेनेने सतत मोदींना लक्ष्य केलेले आहे. आता पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयाची अणुबाँब हल्ल्याशी तुलना करून हा निर्णय देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की उद्योग जगताच्या ‘असोचेम’ या संघटनेने तर काल सांगून टाकले, नोटांबदीनंतर देशात ४० लाख नोकऱया आतापर्यंत गेल्या व आणखी जातील. म्हणजे देशाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटते. जनतेच्या जीवनाची शाश्वती उरली नाही हे स्पष्ट दिसत असल्यानेच आम्ही हे एका तळमळीने बोलत आहोत. राज्यकारभारात शरद पवारांचा सल्ला घेतो अशी पुडी पंतप्रधान मोदी यांनी बारामतीत सोडली तेव्हापासून पवार हे अस्वस्थ आहेत व जमेल तेथे मोदींवर टीका करू लागले आहेत. अर्थात नक्की कोणत्या पवारांवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न महाराष्ट्राला नेहमीच पडलेला असतो. नोटाबंदीच्या निर्णयाचे पवार यांनी आधी स्वागत केले होते. आता हळूहळू स्वागताचे रूपांतर जोरदार विरोधात होऊ लागले आहे.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर टीका होत असली तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाच सहकार क्षेत्रावर टिकून आहे. मग सहकारी बँका, सहकारी पतपेढय़ा, नाहीतर सहकारी साखर कारखाने असोत. शेतकऱयांचा कणाच मोडला आहे व अशा शेतकऱयांचे हाल आज कुत्रा खात नाही. जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालून सरकारने एकजात सर्व जिल्हा बँकांना गुन्हेगार आणि भ्रष्ट ठरवले. शेतकरी त्याच्या रोजच्या व्यवहाराचे पैसे जिल्हा सहकारी बँकेत जमा करतो. कांदे, बटाटे, भाज्या, फळे विकून रोज मिळणारे उत्पन्न जिल्हा बँकेत भरणारा शेतकरी हा काळाबाजारी ठरवला असेल तर सरकारला ‘जय जवान जय किसान’चा पोकळ नारा देण्याचा अधिकार नाही, असेही शिवसेनेने मत मांडले आहे.

Web Title: Narendra Modi has turned India into Hiroshima, Nagasaki by dropping demonetisation bomb: Shiv Sena