प्रकाश आंबेडकरांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी : नरेंद्र पाटील

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 8 October 2020

छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आर्थिक निकषावर त्याकाळामध्ये आरक्षण दिलं आणि त्याच काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणामध्ये काही चांगले करु शकले, परदेशात जावू शकले. तद्नंतर त्यांनी देशाची राज्यघटनाही लिहिली, याचंही भान प्रकाश आंबेडकरांना असावं, अशा शब्दात माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी प्रकाश आंबेडरकांना त्यांच्या वक्तव्याची जाणीव करुन दिली.

सातारा : पुण्यात एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जे उद्गार काढलेत, याचा निषेध असून आंबेडकरांनी थोडा विचार करणं जरुरीचं आहे, अन्यथा परिणामांना समोरे जावे, अशा कडक शब्दात माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी प्रकाश आंबेडरकांवर सडकून टीका केली.  

पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आर्थिक निकषावर त्याकाळामध्ये आरक्षण दिलं आणि त्याच काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणामध्ये काही चांगले करु शकले, परदेशात जावू शकले. तद्नंतर त्यांनी देशाची राज्यघटनाही लिहिली, याचंही भान प्रकाश आंबेडकरांना असावं. मात्र, अशा छत्रपती शाहू महाराजांबद्दल काल एक व्यक्ती सदावर्ते वाईट बोलतात, अफझल खानाची उपमा देतात. याची किव येते. आज आपण खुद्द थेट छत्रपतींना जे शब्द वापरलेत, त्याबद्दल 'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी' या शब्दात पाटील यांनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. 

छत्रपतींच्या वारसदारांचा अपमान कदापि सहन करणार नाही : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

दहा ऑक्टोबरला आमच्या काही बांधवांनी कोल्हापूरच्या माध्यमातून बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात बुधवारी नवी मुंबई येथे संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही एकमुखाने ठरवलं की, बंदची परिस्थिती आज नाही. त्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव, आताच कुठतरी महाराष्ट्र परत सुरळीत सुरु होतोय. अशा परिस्थितीत ११ तारखेला परीक्षा केंद्रावर जावून आपण आंदोलन करुयात, असे सांगतानाच पाटील यांनी, आपण एका बाजूला छत्रपतींबद्दल निंदास्पद शब्द वापरता आणि दुस-या बाजूला त्याच समाजाचे छत्रपती आहेत, त्याच मराठा समाजाला आपण पाठिंबा देता ही तुमची दुतोंडी भूमिका नाही का?, असाही प्रहार पाटील यांनी आंबेडकरांवर केला.

प्रकाश आंबेडकरांच्या एक राजा बिनडोकचा राजेप्रेंमींनी नाेंदविला निषेध

अॅड. आंबेडकर, आपण या ठिकाणी भान विसरले आहात, कृपया करुन भान शुध्दीमध्ये आणून छत्रपतींबद्दल व्यवस्थित बोलावं, परंतु जे आपण केलेलं आहे त्याचा आम्ही निषेधच करत नाही, तर आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतील, अशा कडक शब्दात माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी प्रकाश आंबेडकांवर सडकून टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Patil Criticizes Prakash Ambedkar Satara News