शहरीकरणामुळे नद्यांचं पात्र बदलतंय; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Consequences urbanization noise air and water pollution increasing
शहरीकरणामुळे नद्यांचं पात्र बदलतंय; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

शहरीकरणामुळे नद्यांचं पात्र बदलतंय; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

नाशिक : शहराचा विस्तार होत असताना ध्वनी, वायु, पाणी प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे भुप्रदुषण हीदेखील एक समस्या निर्माण होताना दिसत आहे. शहराची उंची सर्वसाधारण तीन ते साडेतीन फुटांनी वाढल्याचे निरीक्षण पर्यावरण तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले असून, परिणामी उतार वाढून गोदावरी नदीचे पात्र बदलत आहे तर पावसाचे तसेच अन्य पाणी तुंबून भविष्यात दुर्घटनादेखील घडण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराच्या २५९ चौरस किलोमीटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ‘यलो झोन’ टाकण्यात आला असला तरी शहराच्या मध्यवर्ती भाग व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. इमारतींचे जोते (प्लिंथ) रस्त्यापासून तीन ते पाच फूट अधिक उंच असतात. महापालिकेकडून रस्ते विकसित करताना थरावर थर मारले जात असल्याने रस्ते उंच होत आहेत. जसे रस्ते उंच होत आहेत. त्याप्रमाणे नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतींचे जोते वर उचलले जात आहे. प्लिंथसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात भराव टाकला जात आहे.

रस्त्यांचा समतल समायोजित करताना सातत्याने उंची वाढत असून, गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत शहर पूर्वीच्या मूळ जमिनीच्या तुलनेत तीन ते साडेतीन फुटांनी वर उचलले गेले आहे. शहरातील काही भागांमध्ये जुन्या इमारती खोलगट भागात तर नव्याने तयार होत असलेल्या किंवा तयार झालेल्या इमारती उंच भागात आहेत. आता उंचावर असलेल्या इमारतींचा भविष्यात विकास करायचा असल्यास रस्त्यांच्या उंचीनुसार नवीन इमारत तयार होईल. त्यावेळी आणखी उंची वाढून भुप्रदुषणामध्ये सातत्याने वाढ होईल, असा भुतज्ज्ञांचा दावा आहे.

नैसर्गिक उतार गायब

नाशिकमध्ये नैसर्गिक उतार नदीच्या बाजूने आहेत. भराव टाकला जात असल्याने तसेच रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे नदीच्या भागात मोठे उतार तयार झाले आहेत तर नदीच्या एक ते दोन किलोमीटर परिसरात उतार गायब झाले आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास महापालिकेच्या पावसाळी गटार योजनांची क्षमता नसल्याने पाणी वाहून जाणे अशक्य असून त्यातून गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समस्यांची चाहुल

  • नदीकडे जाणारे उतार गायब

  • उतार गायब झाल्यास पावसाळ्याचे पाणी साचून आर्थिक हानी

  • नदी पात्रांचा आकार बदलतोय

  • भूगर्भातील पाण्याला धोका

भूप्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्या अनेक दशकांच्या दुर्लक्षानंतर आपल्याला अलीकडच्या काळात लक्षात आल्या आहेत. नापिक भूखंडांची वाढती संख्या आणि वनक्षेत्राची घटती संख्या चिंताजनक प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरे, शहरांचा विस्तार वाढल्याने उपलब्ध जमिनीचे आणखी शोषण होत आहे. जमिनीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लँडफिल, रिक्लॅमेशनचे नियोजन व अंमलबजावणी केली जात असल्याने जमीन आणखी खराब होते. मातीची धूप झाल्याने जमिनीचा सुपीक भाग धुवून जातो. भूस्खलन हा देखील याचाच एक भाग आहे.

- प्रा. दीपक ठाकरे, पर्यावरण तज्ज्ञ

Web Title: Nashik Consequences Urbanization Noise Air And Water Pollution Increasing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top