राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अधिक आकर्षक

कैलास रेडीज
शनिवार, 13 मे 2017

महिलांचा विचार करून सुधारणा करण्याचे "पीएफआरडीए'चे संकेत

महिलांचा विचार करून सुधारणा करण्याचे "पीएफआरडीए'चे संकेत
मुंबई - अल्पबचतीचे व्याजदर कमी होत असताना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (एनपीएस) अधिक आकर्षक करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचे संकेत निवृत्ती निधी व्यवस्थापन करणाऱ्या "पीएफआरडीए'ने दिले आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून "एनपीएस'मध्ये सुधारणा करणार असल्याची माहिती "पीएफआरडीए'चे अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्‍टर यांनी "सकाळ'ला दिली.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने "पीएफआरडीए'ने (निवृत्ती निधी नियामक आणि विकास संस्था) गतवर्षी "एनपीएस'चे किमान गुंतवणूक शुल्क एक हजारपर्यंत कमी केले होते. त्याशिवाय डिजिटल मंचावर "एनपीएस'ला आणले आहे. सध्या व्याजदर घसरत असल्याने "एनपीएस'वरही परिणाम झाला आहे. त्यातून सभासदांना प्रत्यक्षात मिळणारे व्याज महत्त्वाचे असल्याचे कॉन्ट्रॅक्‍टर यांनी सांगितले. आजचा सरासरी व्याजदर पाहता "एनपीएस' गुंतवणूकदाराला किमान 10 टक्के प्रत्यक्ष व्याज मिळत आहे. दोन ते तीन टक्के जादा व्याज मिळणे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे कॉन्ट्रॅक्‍टर यांनी सांगितले.

"एनपीएस' सदस्यांना चांगला परतावा मिळण्यासाठी "पीएफआरडीए' येत्या काळात शेअर आणि इन्फ्रा ट्रस्ट फंडांतील गुंतवणूक वाढवणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. "एनपीएस'चे 1 कोटी 56 लाख सभासद असून, जवळपास 1.70 लाख कोटींचा निधी आहे. 2015 आणि 2016 या दोन वर्षांत "एनपीएस' सभासदांमध्ये सरासरी 24 टक्के वाढ झाली. त्याचबरोबर मालमत्तेत 46 टक्के वाढ झाली, अशी माहिती कॉन्ट्रॅक्‍टर यांनी दिली. वर्षभरातील नव्या सभासदांपैकी डिजिटल मंचावरील "ईपीएस' सभासदांची संख्या दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना जास्त सवलती
सध्या "एनपीएस'मध्ये महिलांसाठी स्वतंत्र योजना नाही; मात्र "एनपीएस'मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. अटल पेन्शन योजनेतील महिलांची संख्या पाहून "एनपीएस'मध्येही महिलांना सवलती देण्याचा विचार आहे. महिलांचे सहभाग शुल्क कमी करणे; तसेच इतर प्रोत्साहनपर सवलती देण्याबाबत "पीएफआरडीए' अनुकूल आहे, असे कॉन्ट्रॅक्‍टर यांनी सांगितले.

अटल पेन्शन योजनेत कोटींचा निधी
केंद्र सरकारने मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना जाहीर केली. जून 2015 मध्ये या योजनेला सुरुवात झाली. त्याचे व्यवस्थापन "पीएफआरडीए' करत आहे. दीड वर्षात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. अटल पेन्शन योजनेतील निधी 1900 कोटींवर गेला आहे. जवळपास 52 लाख नागरिकांनी अटल पेन्शन योजनेत सहभाग घेतला आहे. यातील 38 टक्के महिला आहेत. उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी झाली आहे.

Web Title: national pension scheme more attractive