चला, निसर्गमित्राला जपूया...!

अमोल सावंत
गुरुवार, 27 जुलै 2017

सर्वांनी नागपंचमी साजरी करायला हवी. यामुळे नागांसह अन्य सर्पांचीही माहिती होईल. नागपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर सर्पांविषयी असलेली भीती काढून टाका. सर्पांच्या वैज्ञानिक माहितीची देवाण-घेवाण करा. सर्पांच्या संख्येची स्थिती फारशी समाधानकारक नाही. यासाठी त्यांचे जतन, संवर्धन करायला हवे. कीटकनाशके, तणनाशकांचाही सर्पांवर परिणाम होत आहे. विनाकारण सर्पांना मारू नये, ते शेतीसाठी वरदान आहेत. 
- अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र संस्था, कोल्हापूर

सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर- घुशी खाते. सापाचे उंदीर पकडण्याचे तंत्र परिणामकारक आहे. नागपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर या निसर्गमित्राला जपण्याबरोबरच सर्पाविषयी माहिती जाणून घेऊया. 
 

सर्पांचे प्रमाण
अंटार्क्‍टिक प्रदेश वगळता साप सर्वत्र आढळतात. जगभरातील जाती- उपजाती ३ हजार ९७० असून, भारतात २७५ प्रकारचे सर्प आहेत. जगातील एकूण सर्पसंख्येपैकी भारताचा वाटा ८.७ टक्के आहे. भारतातील २७५ सापांच्या जातींपैकी ६० विषारी, उर्वरित २१५ बिनविषारी आहेत. जागतिक आकडेवारीनुसार, जगातल्या तीन हजार ९७० सापांपैकी २८० साप विषारी, तर दोन हजार ८९० बिनविषारी आहेत. भारतातील विषारी साप तीन कुळांत विभागले आहेत. पैकी नाग, मण्यार हे विषारी इलापिडी कुळात मोडतात. नाग प्रकारातले पाच, मण्यार प्रकारातले १२ अशा १७ सापांचा या कुळात समावेश आहे. २२ पैकी १२ सापांच्या गटात ट्रायमेरेसरसमधील वेणुनाग, चापडा हे साप सापडतात. या गटातील अन्य साप पश्‍चिम घाट, पूर्वोत्तर हिमालयाच्या जंगलांत सापडतात.

संरक्षण आणि कायदे 
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार साप पकडणे, बाळगणे, ठार करणे हा गुन्हा आहे. १९७५ चे निर्यात धोरण- वन्यजिवांपासून उत्पन्नाविषयीच्या कायद्यानुसार सापांना संरक्षण मिळवून देता येते.

बिनविषारी सर्प 
बिनविषारी सापांची भारतात सात कुळे असून, यात वेगवेगळ्या गटांतील २१५ सापांचा समावेश आहे. यातील सर्वांत मोठे कुळ कोलूब्रिडी आहे. या कुळात ४३ गटांतील १५३ भारतीय सापांचा समावेश आहे. युरोपेल्टीडी कुळात सात गटांतील ३५ साप आहेत. यापैकी सर्वांत मोठा गट युरोपेल्टीस आहे. यात २० शिल्डटेल साप आहेत. हे साप पश्‍चिम घाट, दक्षिण भारतात सापडतात. टीप्लोपाईडीत दोन गटांतील १८ सापांचा समावेश आहे. यापैकी १६ साप टीप्लोप्स गटातील म्हणजे वाळा सर्प आहेत. अजगर, बोवा सापांचा समावेश असलेले बॉईडी कूळ. यात दोन अजगर, तीन बोवा साप आहेत.

साप ओळखण्यासाठी 
सापांविषयी चांगली पुस्तके मिळवून वाचन करा. इंटरनेट सर्च करा. माहिती, फोटो डाउनलोड करा. सापांच्या चित्रफिती पाहून त्यांच्या नैसर्गिक राहणीमानाचे निरीक्षण करा. राष्ट्रीय उद्याने, सर्प उद्यानांना भेट द्या.

सर्पदंश टाळण्यासाठी 
पालापाचोळा, दगड, विटा, लाकडे, माती, गोवऱ्यांचा ढीग घराजवळ रचू नका. झाडी, उथळ पाणी, दलदलीच्या जागी वावरताना काळजी घ्या. घराच्या भिंती, पाया सिमेंटने गुळगुळीत करा; सापाला गुळगुळीत पृष्ठभागावर हालचाल करता येत नाही. भिंतीची छिद्रे बुजवून घ्या. घराजवळील झाडे, वेली घराला स्पर्श करणार नाहीत, अशा पद्धतीने लावा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. अन्न घराबाहेर टाकू नका. अन्नाच्या कणांमुळे उंदीर, घुशी येतात. त्यांना खाण्यासाठी साप येतात. घराभोवती असणारे पाइप व्यवस्थित बुजवा.

सापांचे संर्वधन करूया!
भारतीय संस्कृतीत सापांचे धार्मिक महत्त्व मानले जाते. वस्तुतः साप हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या कृषिप्रधान देशात तो शेतकऱ्यांचा निसर्गमित्र आहे. नागपंचमीच्या निमित्ताने केवळ त्याची पूजा न करता, केवळ साप दिसला म्हणून त्याला न मारता, त्याला जीवदान देऊन त्यांचे सरंक्षण व संवर्धन करायला हवे. त्यासाठी प्रबोधनही हवे.

सापांविषयी गैरसमज
सर्वच साप विषारी असतात
साप चावला तर मनुष्याचा मृत्यू होतो
साप दूध पितो
गाय, शेळीच्या कासेला तोंड लावून दूध पितो
नाग सापपुंगीच्या तालावर डोलतो
रात्री शीळ घातल्यानंतर किंवा साप असे म्हटल्यानंतर तो घरात येतो 
केवडा, रातराणी, चाफा झाडांवर अस्तित्व असते, सापाला सुगंध आवडतो 
साप सूड घेतात, पाठलाग करतात, डुख धरतात 

साप दिसल्यास
तातडीने सर्पमित्रास बोलवा
सुरक्षित अंतर ठेवा
विजेरीचा उपयोग करून साप ओळखा
घालवण्यासाठी लांब काठीचा उपयोग करा
शक्‍यतो सापाला ठार करू नका

पुनरुत्पादन
अंडी देणारे : नाग, मण्यार, अजगर, धामण 
थेट पिलांना जन्म देणारे : घोणस, चापडा, हरणटोळ

वर्गीकरण 
बिनविषारी : नानेटी, दिवड, धामण
निमविषारी : मांजऱ्या, हरणटोळ
विषारी : नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्रसर्प

Web Title: nature, snake, environment, lifesaving