नवबौद्धांना ‘राष्ट्रवादी’कडे आणणार - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

पक्ष पाठीशी ठामपणे उभा राहील - जयंत पाटील
आपण राज्यात चांगली लढत दिली आहे. काही ठिकाणी काही फरकाने पराभव झाले आहेत. त्यातून खचून न जाता नव्या दमाने उभे राहा. पक्ष तुमच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले. राष्ट्रवादी २० ते २५ जागीसुद्धा निवडून येणार नाही, असे सांगितले जात होते. परंतु ६३ ते ६४ जागा येतील, अशी खात्री होती, असेही पाटील म्हणाले.

मुंबई - राज्यातील वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजूला आहे की नाही हे पाहिले नाही, त्यामुळेच त्याचा फटका बसला. आता आपल्या कामाने हा वर्ग आपल्याकडे कसा येईल, असा प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बैठकीत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. विधानसभेची निवडणूक झाली. निकाल संमिश्र लागला. काही मतदारसंघात आणखी काम करण्याची गरज आहे हे लोकांनी लक्षात आणून दिले आहे, असेही शरद पवार या वेळी म्हणाले.

निवडणुकीत तुम्हाला यश आले नाही, त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे (भाजपचे) सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला, असे पवार म्हणाले. पक्षातील कार्यकर्ता माझ्यासाठी काम करत नाही. तो विरोधी काम करतो, त्या वेळी मी स्वतःचे काम तपासून घ्यायला हवे, असा सल्ला पवार यांनी दिला. यंदाच्या निवडणुकीत तरुणांनी पक्षाला चांगला पाठिंबा दिला. मुळात अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको, असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. जो मुस्लिम समाज ‘वंचित’च्या पाठीशी राहिला तो विधानसभेत मुस्लिम समाज बाजूला गेला, तर नवबौद्ध आणि इतर ‘वंचित’च्या मागे उभा राहिला. काही ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे. त्या ठिकाणी नव्याने संधी दिली पाहिजे, त्या वेळी तो जोमाने काम करेल, असेही शरद पवार म्हणाले.

नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
अपयशाने खचू नका. नव्या उमेदीने तयारीला लागा, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. ज्या ज्या जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आम्ही दौरा सुरू करत आहोत. लोकांच्या मागे धावून जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे, असेही स्पष्ट केले. 

आता पक्ष सोडून गेलेले पुन्हा येऊ का...येऊ का...असं विचारू लागले आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी खिल्ली उडवली. बारामतीत मला का आघाडी मिळते, याची माहिती घेण्यासाठी बारामतीत एकदा तरी या, असा सल्लाही पवार यांनी दिला. विधानसभा व लोकसभेत सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असेही पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navbauddha NCP Sharad Pawar Politics