esakal | कोणाला तरी वाचवण्यासाठी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करताहेत - प्रवीण दरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin-Darekar

कोणाला तरी वाचवण्यासाठी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करताहेत - दरेकर

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : कोणाला तरी वाचवण्यासाठी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करत आहेत असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केला आहे. मलिक यांनी क्रूझ रेव्ह पार्टीप्रकरणी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना त्यांनी हा आरोप केला आहे.

हेही वाचा: '... तर जनता बुडाखालील खुर्च्या काढून घेईल'

दरेकर म्हणाले, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणं आणि इतर माहिती घेणं त्यांच्यासाठी सोप आहे. नार्कोटिक विभागाकडून पोलिसांकडून माहिती मिळवून ते तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळ विषयापासून दूर जात कोणालातरी वाचवण्यासाठी त्यांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती एजन्सीला द्या म्हटल्यावर आमचा एजन्सीजवर विश्वास नसल्याचं ते सांगतात. जर एजन्सीवर आणि न्यायालयावर विश्वास नसेल तर गंभीर आहे. समजून उमजून असे प्रकार सुरु असल्याचं स्पष्टपणे दिसतं.

जावयाच्या अटकेवरुन मलिक आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरायचं का?

भाजपवर दोषारोप करत असताना आमच्या नेत्यांवरही आरोप होत आहेत पण ते अजून सिद्ध झालेले नाहीत. पण मलिक यांच्या जावयाला थेट एनसीबीनं अटक केली आहे मग आम्ही मलिक यांना आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरायचं का? असा सवालही यावेळी दरेकर यांनी केला. डिजिटलायझेशनमुळं फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स बनावट बनवली जातात. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात मलिकांनी दिलेली गोष्ट सत्य मानण्याची घाई करायला नको. जे खरं असेल ते निश्चितपणेच बाहेर येईल. यानंतर फर्जीवाडा कोणाचा हे कळून येईल.

मलिकांनी त्यांच्याकडील माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी

सीबीआय, ईडी, एनआयए किंवा एनसीबी असेल या देशातील सर्वात विश्वासार्ह एजन्सी आहेत. यापेक्षा मलिक यांना जास्त ज्ञान असेल कायद्याची माहिती असेल तर तेच ज्ञान त्यांनी संबंधीत व्यासपीठावर मांडावं. या सर्व गंभीर आरोपांची दखल एनसीबी घेतंच असेल प्रसारमाध्यमांसमोर जर एखादा जबाबदार मंत्री बोलत असेल तर संबंधित एजन्सी घेतील. त्या अनुषगानं खरंखोटं समोर येईल. नवाब मलिक यांचे आरोप म्हणजे आरोपांची सिद्धता नाही. या विषयाचा निपटारा होण्यास मलिक यांच्या विधानाचा फायदा होईल. कारण पोलीस यंत्रणा त्यांच्याच हातात आहे, असंही यावेळी दरेकर म्हणाले.

loading image
go to top