esakal | जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवकांचा गौरव करणार - नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab malik

जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवकांचा गौरव करणार - नवाब मलिक

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : शांघाय स्पर्धेत (Shanghai Competition) पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिंपिक स्पर्धांच्या (Olympic sports) धर्तीवर राज्य शासनामार्फत (government) रोख रकमेचे (Gift in Cash) पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आज मुंबईत केली.

हेही वाचा: वातावरण बदलाचा फटका; अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत समारोप झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कौशल्य विकासच्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील 263 युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील 132 युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुवर्णपदक विजेत्यासाठी दहा हजार रुपये, रजत पदक विजेत्यासाठी सात हजार रुपये तर कांस्य पदक विजेत्यासाठी पाच हजार रुपये पुरस्कार रक्कमही देण्यात आली.

आता गांधीनगर येथे होणाऱ्या झोनल स्पर्धेत आणि त्यानंतर बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या युवक-युवतींना मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तर शांघाय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिंपिक स्पर्धांच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा: पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रवेशाला मुदतवाढ

राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांची संपूर्ण तयारी कौशल्य विकास विभागामार्फत करून घेण्यात येईल. त्यांना राज्य शासनामार्फत जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे मंत्री मलिक म्हणाले. महाराष्ट्रातील युवक-युवतीमध्ये चांगले टॅलेंट आहे. कौशल्यातील टॅलेंट शोधण्यासाठी आयटीआयबरोबरच विविध उद्योग, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी शोध घेऊन टॅलेंट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

परळ येथील आयएसएमइ स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रेनेऊर्शिप येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन रुस्तम इराणी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सीनियर हेड जयकांत सिंह, डॉ. इंदू सहानी आदी मान्यवर उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रात चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या 2 विद्यार्थ्यांची जबाबदारी तथा स्पॉन्सरशिप आपण स्वीकारीत आहोत, असे बोमन रुस्तम इराणी यांनी यावेळी जाहीर केले.

loading image
go to top