''माझे वडील हिंदू, तर आई...'' मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

''माझे वडील हिंदू, तर आई...'' मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा

मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) हे चांगलेच वादात सापडल्याचे दिसत आहे. एनसीबीच्या पंचाने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर नवाब मलिक (minister nawab malik) हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला असून ''समीर दाऊद वानखेडे इथंपासून हा फर्जीवाडा सुरू'' झाल्याचं म्हटलं. त्यानंतर आता वानखेडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून नवाब मलिक यांना नोटीस बजावणार आहेत.

''नवाब मलिक हे माझ्या खासगी गोष्टीचं जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मलिक माझ्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त अधिकारी असून ते हिंदू आहेत, तर आई झाहिदा ही मुस्लिम आहे. मी हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही धर्मासोबत संबंधित असून मी स्वतंत्र्य विचाराचा आहे.'', असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी केलेला वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा दावा खरा?

समीर वानखेडे यांचे यापूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो मंत्री नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर देखील समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ''माझं पहिलं लग्न डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत २००६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये मी तिच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर क्रांती रेडकरसोबत विवाह केला'' अशी माहिती वानखेडे यांनी पत्रातून दिली आहे.

नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार -

नवाब मलिक यांनी 'समीर दाऊद वानखेडे यहां से सुरू हुआ फर्जीवाडा' असं ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली असून त्यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यासाठी मंत्री नवाब मलिक यांना नोटी बजावणार आहे, असंही समीर वानखेडे यांनी सांगितले.