रोजीरोटीचा प्रश्न सुटणार का? ; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Ajit Pawar Criticism

रोजीरोटीचा प्रश्न सुटणार का? ; अजित पवार

मुंबई : तुमच्या - माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेदांत प्रकल्पाचे काय होणार, तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी अजून किती लाख कोटीची गुंतवणूक येणार हे सांगा असा,’’ असे आवाहन केले.

जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकार, राज्य सरकारवर हल्लाबोल करीत राजकारणात होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. वेदांत प्रकल्पासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. मात्र त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा प्रयत्न सुरू होता. मात्र काही पक्षांतील लोक वेगळ्या मागण्या केल्या म्हणून प्रकल्प गेला, असे विधान करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असे अजिबात झालेले नाही. तरी पण चौकशी करायची असेल तर जरूर करा ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असे आव्हान पवार यांनी शिंदे सरकारला दिले.

शिवाजी पार्कवरच मेळावा व्हावा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करावा. शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानावर मेळावा घ्यायला परवानगी मिळाली आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना परवानगी द्यायला हवी. दोन्ही मेळावे व्हावेत आणि दोघांचे विचार राज्याने ऐकावे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

एसटी महामंडळाला आधार द्या

एसटी महामंडळासाठी चौदाशे कोटींची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली होती असे सांगताना अजित पवार यांनी एसटीचे पगार साडेतीनशे कोटीवर जातात. मधल्या काळात जो काही संप झाला होता त्यानंतर गाड्या सुरू झाल्या आहेत. महामंडळाच्या स्वतःच्या उत्पन्नातून पगार होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत याबद्दल सरकारने बारकाईने लक्ष द्यावे अशी सूचनाही अजित पवार यांनी सरकारला केली.

निर्मला सीतारामन यांचे स्वागत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येणार असल्याचा प्रश्न विचारताच ‘‘त्यांचे बारामतीत स्वागत आहे. कुणालाही कुठेही जायचा अधिकार आहे. अजून कुणाला यायचे असेल त्यांनी यावे, बारामतीकर त्यांचे मनापासून स्वागत करतील आणि वेगवेगळ्या निवडणुकीत कुणाची बटणे दाबायची ते दाखवतील,’’ असे अजित पवार म्हणाले.

Web Title: Ncp Ajit Pawar Criticism Cheetah Inflation Unemployment Law And Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..