"राष्ट्रवादी'चा आघाडीचा सूर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - कॉंग्रेसवर कायम दबाव टाकून वाटाघाटीत यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता आघाडीचा सूर आळवला आहे. मुंबईवगळता राज्यातील इतर महानगरपालिका व पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांत आघाडी करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू केल्या आहेत. 

मुंबई - कॉंग्रेसवर कायम दबाव टाकून वाटाघाटीत यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता आघाडीचा सूर आळवला आहे. मुंबईवगळता राज्यातील इतर महानगरपालिका व पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांत आघाडी करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू केल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आज याबाबतची महत्त्वाची बैठक झाली. या वेळी निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांतील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. दहापैकी आठ ते नऊ महानगरपालिकांत आघाडी करण्यास पूरक वातावरण असल्याचे चित्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे, अकोला, अमरावती व नागपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडीची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सामोर आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागावाटपाचे सूत्र ठरवावे असे या वेळी निश्‍चित करण्यात आले. मुंबईत मात्र कॉंग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे आघाडीची शक्‍यता मावळली आहे. 

महानगरपालिकांत आघाडीचे संकेत असले तरी जिल्हा परिषदांतही स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश जिल्ह्यांत आघाडी करूनच लढावे असे पदाधिकाऱ्यांचे मत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कायम स्वबळावर लढणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता आघाडीचे सूर जुळत असल्याचे दिसते. 

युतीत केवळ मुंबईपुरतीच चर्चा 
राज्यात दहा महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन चर्चेला सुरवात झाली असली तरी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची युतीबाबतची चर्चा केवळ मुंबई महापालिकेपुरती केंद्रित झाली आहे. इतर ठिकाणी युतीचे आधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे सोपवले असले, तरी अद्याप कोठेही युती झाल्याची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे तूर्तास भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे घोडे मुंबई महापालिका जागा वाटपाच्या बैठका आणि चर्चेच्या गुऱ्हाळ पुढे सरकले नसल्याचे चित्र आहे. 

भाजप अणि शिवसेनेचे सारे लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेश स्तरावरील नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वक्‍तव्ये ही मुंबई महापालिकेच्या अनुषंगानेच होत असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपबरोबरच्या जागावाटपाची 21 जानेवारी ही "डेडलाइन' शिवसेनेने ठेवली आहे. कारण 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. भाजपबरोबर मुंबईत युती झाली अथवा नाही झाली तरी उद्धव ठाकरे त्या दिवशी शिवसैनिकांना आवाहन करत पुढील रणनीती जाहीर करतील. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील जागावाटपाच्या भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. भाजपने मुंबई महापालिकेसाठी 227 पैकी निम्या जागा मागितल्या आहेत, तर शिवसेनेने नेमक्‍या कोणत्या जागा हव्यात, याची यादी भाजपकडून मागवली आहे. 

मुंबईवगळता इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर चर्चेपेक्षा एकमेकांवर टीका, आरोप करण्यात दोन्ही पक्षांचे नेते मग्न आहेत. नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी तर दोन्ही बाजूंकडील नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करण्याची मोहीम उघडली आहे. 

भाजपचे घटक पक्ष वाऱ्यावर 
भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फार्स सुरू असताना भाजपचे घटक पक्ष रिपाइं आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शिवसंग्राम यांच्याकडे भाजपकडून दुर्लक्ष झाल्याचे या घटक पक्षांच्या नेत्यांचे मत आहे. भाजप-शिवसेना यांची जागावाटपाची चर्चा पुढे सरकत नाही. त्यामुळे भाजपच्या घटक पक्षांची अवस्था वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली आहे.

Web Title: NCP alliance