रमेश कराड यांची उमेदवारी मागे; राष्ट्रवादीला जबर धक्का

सयाजी शेळके
सोमवार, 7 मे 2018

ज्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी पक्षात घेतले, त्या राष्ट्रीय पक्षाला त्याची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागते, यापेक्षा दुसरी नामुष्की कुठली असू शकते.     
- सुरेश धस, उमेदवार, भाजप.

उस्मानाबाद : उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. सात) दुपारी तीनपर्यंत होती. कराड दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर होते. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सूचनापत्र दाखल केले. उमेदवारी मागे घेतल्याचे कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, थोड्याच दिवसात याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे कराड यांनी सांगितले.  

कराड यांनी दोन मे रोजीच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षप्रवेशाच्या वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्री. कराड, भारतीय जनता पक्षाकडून सुरेश धस यांनी उमेदवारी दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय अन्य चार जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी श्री. जगदाळे वगळता उर्वरित चौघांनी दुपारी दोनपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अडीचच्या सुमारास श्री. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष म्हणून श्री. जगदाळे हे आहेत.

ज्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी पक्षात घेतले, त्या राष्ट्रीय पक्षाला त्याची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागते, यापेक्षा दुसरी नामुष्की कुठली असू शकते.     
- सुरेश धस, उमेदवार, भाजप.

Web Title: NCP candidate Ramesh Karad withdraw nomination in legislative council election