‘राफेल’चे भूत सरकारला गाडेल - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नांदेड -  ‘‘केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली आणि सगळ्यांनाच फसविले आहे, त्यामुळेच देशाच्या हितासाठी आणि ऐक्‍यासाठीच महाआघाडीची स्थापना झाली आहे. भाजपच्या सरकारने ‘राफेल’च्या प्रकरणात केलेला कोट्यवधीचा गैरव्यवहार आता उघड झाला आहे. त्यामुळे राफेलचे भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही,’’ असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीची राज्यातील पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडला आज सायंकाळी इंदिरा गांधी मैदानावर झाली, त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, अमित देशमुख, फौजिया खान आदी उपस्थित होते. 

या वेळी सर्वांत घणाघाती भाषण भुजबळ यांचे झाले. ते म्हणाले, ‘‘भाजपने सर्वसामान्यांची खूप फसवणूक केली आहे. मोदी म्हणतात मी चहा विकून इथपर्यंत आलो; पण त्यांनी विकलेला चहा कुणीही पाहिलेला नाही. त्यांच्या अशा खोट्या दाव्यांनी जनता वैतागली आहे. चहा विका नाही तर काहीही करा; पण देश विकू नका. माझ्यावर कारवाई केली; पण एक लक्षात ठेवा, सत्तेच्या जोरावर तुम्ही सगळं करू शकता; पण लोकांचं प्रेम तुम्ही जप्त करू शकत नाही.’’ युतीवरही त्यांनी जोरदार टीका केली.

सहनशीलता संपली
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘बहुत हो गई जुमले की मार... आओ बदले भाजप सरकार, असे जनता म्हणत असून, जनतेची सहनशीलता आता संपली आहे. त्यामुळे बदल अटळ असल्यामुळे आणि महाआघाडी झाल्यामुळेच शिवसेना- भाजपने युती केली आहे. घोषणांचा पाऊस आणि सरकारी पैशांची उधळपट्टी भाजप सरकारने केल्यामुळेच सर्वसामान्यांना मोर्चे काढावे लागले.’’

Web Title: NCP chief Sharad Pawar slams Narendra Modi government on Rafale deal in Nanded