शरद पवारांविषयी असलेल्या आदरयुक्त भीतीमुळे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले.
सातारा : मुंबईतील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे अजितदादांच्या गटात येण्यासाठी त्यांच्यावर दिवसेंदिवस दबाव वाढू लागला आहे.
एकीकडे दादांशी असलेले नातेसंबंध आणि पवारांचा दबाव या पार्श्वभूमीवर मकरंद पाटलांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. यातच सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक आज (शनिवारपासून) युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर निघाले असून, यामध्ये मकरंद पाटील यांचेही नाव आहे.
सध्याची ही राजकीय घडामोड लक्षात घेता निर्णय न घेताच मकरंद पाटील युरोपच्या दौऱ्याला जाणार का? याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपापली भूमिका जाहीर करून दोन्हीपैकी एका गटात उडी मारली.
मात्र, वाईचे आमदार मकरंद पाटील यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. कारण मुंबईतील दोन्ही गटांच्या बैठकींकडे मकरंद पाटील यांनी पाठ फिरवली होती. अजित पवार यांनी सर्वप्रथम शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमदार मकरंद पाटील यांचे नाव त्या ३४ आमदारांच्या यादीत होते, तसेच त्यांचे मंत्रिपदाच्या यादीतही नाव होते.
यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीस ते उपस्थित होते; पण त्यांनी आम्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेऊन मगच निर्णय घेऊ, असे सांगून निघून आले. त्यानंतर किसन वीर कारखान्याच्या भवितव्यासाठी तुम्ही निर्णय घ्याल तो निर्णय मान्य असेल, असे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले होते; पण शरद पवारांविषयी असलेल्या आदरयुक्त भीतीमुळे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले.
मात्र, दुसऱ्या दिवशी मुंबईत खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन्ही बैठकांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्याच दिवशी जिल्हा बॅंकेच्या संचालकांच्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यासाठी वैद्यकीय तपासणी असल्याने ते बैठकीला जाऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या या अनुपस्थितीमुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात राहिली आहे.
दरम्यान, दादा गटाकडून त्यांना सातत्याने संपर्क करून गटात सहभागी होण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यासाठी सातत्याने फोन येत आहेत. याशिवाय अजित पवार यांच्याशी मकरंद पाटील यांचे नातेसंबंध पाहता, त्यांना निर्णय घेणे भाग पडणार आहे. एकीकडे दबाव आणि दुसरीकडे नातेसंबंध जपणे अशा दुहेरी कचाट्यात ते अडकले आहेत.
त्यातच जिल्हा बॅंकेच्या संचालकांची युरोप टूर आज (शनिवारी) पासून सुरू होत आहे. हा दौरा १८ दिवसांचा आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते सहभागी झाले तर त्यांची दादा गटाच्या ससेमिऱ्यापासून मुक्तता होणार आहे; पण परत आल्यावर त्यांना पुन्हा काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे.
कार्यकर्त्यांचा निर्णय लक्षात घेता मकरंद पाटील युरोप टूर टाळून दादा गटात सहभागी होऊन मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात. तसा निर्णय त्यांच्या पुढील वाटचालीस फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे मकरंद पाटील काय निर्णय घेणार, हे शनिवारी दुपारीच स्पष्ट होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.