Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गड होणार आणखी मजबूत; 'हे' आहेत उमेदवार

टीम ई-सकाळ
Wednesday, 2 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप वळसे, पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातील 10 जणांचा समावेश आहे. 

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप वळसे, पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातील 10 जणांचा समावेश आहे. 

पुणे शहर

पुणे शहरातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात हडपसरमधून शहराध्यक्ष चेतन तुपे, पर्वतीतून नगरसेविका अश्‍विनी कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके आणि वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे यांना संधी मिळाली आहे. 

पुण्यात आघाडी

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची आघाडी आहे. आघाडीतील जागा वाटपानुसार पुण्यातील आठ पैकी चार जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. तर तीन जागा कॉंग्रेस आणि कोथरुड मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाट्याला जातील, असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले होते.

Vidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी

पर्वतीचा वाद संपला

जागावाटपात पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना कॉंग्रेसही या मतदारसंघावर अडून होती. त्यावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच होती. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली असून, या मतदारसंघातून अश्विनी कदम यांना संधी मिळाली आहे.

शहर जिल्ह्यातील एकूण 10 नावे जाहीर

बहुप्रतीक्षेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची 77 जागांची यादी बुधवारी रात्री जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेले असताना ही यादी जाहीर झाली आहे.

Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे उद्या भरणार उमेदवारी अर्ज; शक्तिप्रदर्शन करणार

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून अतुल बेनके, आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील, शिरूरमधून अशोक पवार, दौंड मधून रमेश थोरात, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, बारामतीमधून अजित पवार यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

पार्थ यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम

बारामतीमध्ये अजित पवार यांचे नाव जाहीर झाल्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकालात निघाला आहे. 

पिंपरी-चिंचवड अजून वेटिंगवर

तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मधील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP First candidate list Declared These are Candidates from Pune