शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 80 लाखांचा कृतज्ञता निधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात रहातो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस 13 डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा 11 डिसेंबर आहे.

मुंबई : आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवा असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बळीराजा कृतज्ञता दिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीकडून 1 कोटी 80 लाखांचा कृतज्ञता निधी प्रदान करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात रहातो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस 13 डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा 11 डिसेंबर आहे याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. 

माझी लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस : पवार

माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. 1936 साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली. 

सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणुस आहे असेही शरद पवार म्हणाले. 

आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP gives fund to welfare for farmers families