तुझ्या चुलत्याने तुझ्या बापाला का मारले असे आम्ही विचारले तर?: पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

आपलं वय काय... आपली राजकीय कारकीर्द काय... स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते...आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना 'शकूनी मामा'ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला.

बारामती शहर : आपलं वय काय... आपली राजकीय कारकीर्द काय... स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते...आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना 'शकूनी मामा'ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पूनम महाजन यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना 'शकूनी मामा'ची उपमा दिली होती. अजित पवार यांनी आज आपल्या भाषणात पूनम महाजन यांचा आपल्या शैलीत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ''आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं. तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं असं जर आम्ही तुला विचारलं तर तुझ्याकडे काय उत्तर आहे...सख्या भावाने सख्ख्या भावाला मारलं, मग हे महाभारत कशामुळे घडलं, असा प्रश्न आम्ही विचारायचा का तुम्हाला? जसं तुम्हाला बोलता येतं तसा आम्हाला बोलता येतं. पण पातळी सोडायला नको हा विचार करून आम्ही काही बोलत नाही. पण आम्ही शांत बसतो याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ते सहन करू असा होत नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे आम्ही जास्त शहाणपणा करू नये आणि तुम्ही संयम पाळावा असे पवार म्हणाले. आपल्या आपल्या उंचीप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि याचे भान ठेवले पाहिजे असा टोलाही त्यांनी महाजन यांना लगावला.

महाराष्ट्रातील माती अयोध्येत नेऊन काय साध्य झाले

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून अजित पवार यांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. महाराष्ट्रातील माती अयोध्येमध्ये नेऊन त्यांनी काय साध्य केले, असे विचारत काहीही बनवा बनवी करतात असा आरोप केला.

शिवजयंतीला कधीही हे लोक शिवरायांना अभिवादन करायला शिवनेरीला येत नाहीत, हे लोक मुंबईत राहतात पण सहा डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला दादरला ते येत नाहीत. हेच एकेकाळी म्हणत होते ज्यांच्या घरात खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ ....आणि आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे असे सांगत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.

अयोध्येत राम मंदिर बांधायला निघालेले आहेत. पण तुमचे वडील जाऊन पाच वर्षे झाले अजून त्यांचं स्मारक मुंबईत का उभे राहिले नाही, याकडे लक्ष द्या असेही ते म्हणाले.

Web Title: NCP Leader Ajit Pawar Angry on MP Poonam Mahajan