Sharad-Pawar-Ajit-Pawar
Sharad-Pawar-Ajit-Pawar

व्यथित अजितदादांचे भावूक ‘कमबॅक’!

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारात शरद पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याने व्यथित झालेल्या अजित पवार यांनी आज (ता.28) भावूक होत राजकारणात ‘कमबॅक’ केले. आमदारकीचा राजीनामा देऊन अज्ञातवासात गेलेल्या अजित पवार यांचे वीस तासानंतर आज सार्वजनिक राजकारणात आगमन झाले.

पक्षाचे अध्यक्ष व कुटुंबप्रमुख शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी अजित पवार यांचे आज दुपारी 12:40 ला आगमन झाले. त्यानंतर शरद पवार, श्रीनिवास पवार (अजितदादांचे बंधू), सुप्रिया सुळे, पार्थ पवार व अजित पवार यांच्यात कौटुंबिक चर्चा झाली. सुमारे दीड तासाच्या चर्चेनंतर अजित पवार यांना समजावण्यात शरद पवार व कुटुंबियांना यश आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले व त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

कोणत्याही घोटाळ्यात अकारण ओढून ताणून पवार कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या बँकेच्या ठेवी केवळ 11500 कोटींच्या दरम्यान आहेत, त्या बँकेत 25,000 कोटींचा घोटाळा होऊच कसा शकतो? या बँकेवर सर्वच पक्षातील नेते संचालक असतानाही केवळ शरद पवार व अजित पवार यांचेच नाव घेऊन घोटाळा घोटाळा असं बिंबवून बदनाम करण्याचा प्रयत्न ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहे. आणि शरद पवार यांना त्यामध्ये गोवण्याचा नाहक प्रयत्न होत आहे.

पवार कधीही या बँकेचे संचालक राहिले नाहीत, तरीही त्यांच्यावर ईडी गुन्हा नोंद करते, हे अनाकलनीय आहे. या बँकेतील व्यवहाराची अधिकृत यंत्रणांकडून चौकशी झाली, पण कोणाच्या तरी याचिकेनुसार बिनधास्तपणे 25 हजार कोटींचा आकडा पुढे केला जातो. त्यामुळे मी प्रचंड व्यथित झालो होतो. पवार साहेबांना या सर्व प्रकरणाचा नाहक त्रास सोसावा लागत असल्याने मी अशा राजकारणाला कंटाळलो. तीस वर्षे राजकारणात सक्रिय असलो तरी आम्हाला पण काही भावना असतात, असे म्हणताना अजित पवार यांचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. 

दरम्यान, राज्य बँकेच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जरूर व्हायला हवी, पण ती किती वर्षे सुरू ठेवणार? असा सवाल त्यांनी केला. या बँकेच्या संचालक मंडळात अजित पवार यांचे नाव नसते, तर हा कथित घोटाळा बाहेरच आला नसता, असा दावा ही त्यांनी केला. माझ्यासाठी शरद पवार यांचा शब्द अंतिम असून ते जे सांगतील, ते मला नेहमीच मान्य असते, असे स्पष्ट करताना पवार कुटुंबियात कोणताही गृहकलह नसल्याचे ते म्हणाले. 

भावूक दादा व धिरोदत्त शरद पवार
राजीनामा देऊन अज्ञातवासात गेलेल्या अजित पवार यांच्याशी आज सकाळी शरद पवार यांचा संपर्क झाला. त्यावेळी अजित पवार मुंबईत, तर शरद पवार पुणे येथे होते. भेटायला येतोय असे अजित पवार यांनी कळवल्यानंतर मीच मुंबईत येतोय, घरी ये असे शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. दुपारी पावणे एकच्या सुमारास अजित पवार सिल्व्हर ओक या पवारांच्या घरी पोहचले.

संपूर्ण कुटुंबियात सविस्तर चर्चा झाल्यानंतर अजित पवार बाहेर पडले. त्यावेळी शरद पवार त्यांच्या पाठिशी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. तर अजित पवार भावूक झाल्याचे स्पष्ट दिसत होते. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांचा हा धिरोदात्तपणा स्पष्टपणे जाणवत होता. 

अजित पवार स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील, असं सांगताना शरद पवार यांच्यातील वडिलकीचे भाव जाणवत होते. आमची बैठक ही कौटुंबिक होती. राजकिय भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजित पवार पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतील व त्यांची भूमिका मांडतील, असे सांगत ‘काळजीचे काही कारण नाही’, असे म्हणताना पवार यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव दिसत होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com