पवार कधी कुणाला कळणार नाहीत : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

आजच्या शिक्षण पद्धतीत बदल करून प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. याचा पुढील पिढीला फायदा होईल.

औरंगाबाद : 'जिव्हाळा आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करणे ही पवार कुटुंबाची ओळख आहे. पवार हे एकत्र आहेत आणि शेवटपर्यंत एकत्रच राहतील. आमच्यात फूट पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत. पवार कुणाला कळले नाहीत आणि कळणारही नाहीत,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथे आयोजित करण्यात आलेल्या महाएक्सपो कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी रोहित पवार आणि भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांनी नोकरी करण्यापेक्षा रोजगार करण्याकडे आपला मोर्चा वळवला पाहिजे, असा सल्ला दिला. 

- क्रिकेट खेळताना 'कबीर सिंग' जखमी; पडले 13 टाके!

शुक्रवारी (ता.10) बारामतीकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पवार कुटुंबातील अन्य कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा झाल्यावर रोहित पवार म्हणाले, हा वैयक्तिक सत्कार आहे. सत्कारापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपापली कामे करा, असे खुद्द अजितदादांनी सांगितले होते. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. ज्यांना काही कामे नाहीत, ते अशा वायफळ चर्चा करत असतात, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. 

पुण्यातील सारथी संस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, आंदोलनही करण्यात आले याविषयी पवार म्हणाले, दोन अधिकाऱ्यांमधील वाद असल्याच्या आणि इतर काही तांत्रिक अडचणी असल्याचे कळले. त्या त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. सारथीला ताकद दिली पाहिजे. अडथळे दूर करून ही संस्था लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत. 

- Happy birthday Rahul Dravid : टीम इंडियाची 'दीवार'!

बार्टी, ज्योती आणि सारथी या संस्था गोरगरीब मुलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना व्हावा, या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे उपोषणाला बसले याची राज्य सरकारने दखलही घेतली. त्यामुळे सारथीचे अडथळे लवकर दूर करून ती कार्यरत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

तसेच आजच्या शिक्षण पद्धतीत बदल करून प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. याचा पुढील पिढीला फायदा होईल. याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना भेटून त्यांना विनंती पत्र दिले असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  

- मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शरद पवार सरसावले

ते पुढे म्हणाले, राज्यातील शेतकरी आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे. आत्महत्या करण्याची कारणे वेगवेगळी आहेत. शासकीय उपाययोजनांचा अभाव हे त्यापैकी एक कारण होऊ शकते. मात्र, आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी राज्य सरकार योग्य पाऊल उचलेल, असा मला विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader and MLA Rohit Pawar spoke about Pawar family