Happy birthday Rahul Dravid : टीम इंडियाची 'दीवार'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

द्रविडच्या नावावर काही अजबगजब रेकॉर्ड ही नोंदविले गेले आहेत. कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा एकमेव फलंदाज असं रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाले आहे.

भारतीय क्रिकेट विश्वात अनेक महान खेळाडू होऊन गेले, सध्याच्या संघातही काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे महान होण्याची क्षमता आहे. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात ज्याला ध्रुवताऱ्याची उपमा देता येईल, तो क्रिकेटपटू म्हणजे राहुल द्रविड होय. 

Image may contain: 1 person, smiling, text

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

द्रविड आज 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे. टीम इंडियाची दिवार असं त्याला मिळालेलं विशेषण त्याच्याबद्दल बरंच काही सांगून जातं. 11 जानेवारी 1973 मध्ये मध्य प्रदेश च्या इंदूर मध्ये त्याचा जन्म झाला. आणि जून 1996 मध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स वर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन हे भारतीय संघाचे कर्णधार होते आणि संजय मांजरेकर दुखापत ग्रस्त असल्याने त्यांच्या जागी द्रविडची वर्णी लागली. या आपल्या पहिल्या वहिल्या सामन्यात द्रविडने 95 धावांची खेळी साकारली आणि आपण कसोटी क्रिकेट मध्ये बादशहा बनायला आलो आहोत याची साऱ्या जगाला खात्री करून दिली. मात्र, या सामन्यात दादाने (131) केलेल्या शतकी खेळीमुळे त्याची चर्चा होऊ शकली नाही. 

Happy Birthday Rahul Dravid : 'द वॉल'ची ही खेळी पाहाच; बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

एकहाती सामना जिंकून द्यायची तयारी ठेवणाऱ्या सचिनला गॉड ऑफ क्रिकेट म्हटले जाते. मात्र, जेव्हा तोदेखील अपयशी ठरला तेव्हा तेव्हा द्रविड टीम इंडिया ची द वॉल बनून उभा राहिला. त्यामुळेच त्याला भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी क्रिकेट मधील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते. मात्र, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या छत्रछायेखाली त्याची खेळी झाकोळून जात राहिली. पण, तरीही त्याने आपला खेळ कधी सोडला नाही. तो लढत राहिला, अगदी निवृत्ती घेईपर्यंत. हे त्याच्या 16 वर्षाच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीतून दिसते. जिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका द्रविडने निभावली. जेव्हा संघाला सलामीवीर पाहिजे होता, तेव्हा द्रविड सलामीसाठी मैदानात उतरला. जेव्हा वन डाऊन खेळायला सांगितले तेव्हा तो तिथेही खेळला. जेव्हा दादाने ग्लोव्हज घालून विकेटकीपिंग करायला सांगितली, तेव्हा तेही केले. टीम इंडिया चा अनियमित विकेटकीपर अशी भूमिकाही त्याने बजावली आहे. लढत राहण्याची जिद्द आणि उर्मी त्यानं कधी सोडलीच नाही. सचिन, सेहवाग, गांगुली, लक्ष्मण हे आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यावर शेवटच्या खेळाडूला हाताशी धरून संघाला पराभवाच्या छायेतून त्यानं बाहेर काढलं आहे. अंडर प्रेशर कसं खेळावं याचा आदर्श आपल्या क्लास बॅटिंगमधून त्यानं जगाला दाखवून दिला.

- धोनी लवकरच वनडेमधून निवृत्त होऊ शकतो : शास्त्री 

द्रविडची कसोटी आणि वनडे कारकीर्द :- 
कसोटी -
सामने - 164
धावा - 13288
शतके - 36 
अर्धशतके - 63

वनडे :- 
सामने - 344 
धावा - 10889
शतके - 12
अर्धशतके - 83

द्रविडच्या नावावर काही अजबगजब रेकॉर्ड ही नोंदविले गेले आहेत. कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा एकमेव फलंदाज असं रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाले आहे. 16 वर्षांच्या क्रिकेट करियर मध्ये त्याने 31,258 चेंडू खेळले आहेत. आणि 736 तास तो खेळपट्टीवर तो उभा होता, हा पण एक रेकॉर्ड बनला आहे. त्यामुळंच त्याला द वॉल म्हटले जाते.

- द्रविड हा जगातील पहिला खेळाडू ठरला, ज्याने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या जगातील सर्व 10 देशांच्या संघांविरुद्ध शतक ठोकले आहे. 

- केवळ फलंदाजीतच नाही, तर स्टंप मागेही त्याने चौफेर टोलेबाजी केली आहे. संघाचा अनियमित विकेटकीपर असताना त्याने कसोटीमध्ये 210 कॅच पकडले आहेत. जे की गैर-विकेटकीपरने घेतलेले सर्वाधिक कॅच ठरले आहेत. 

- आणखी एक विशेष रेकॉर्ड द्रविडच्या नावावर आहे तो म्हणजे, 300 धावांच्या पार्टनरशिपचा. वनडे क्रिकेट सामन्यात दोनवेळा 300 पेक्षा जास्त धावांची पार्टनर शिप करणारा एकमेव खेळाडू असा विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

- तसेच कसोटीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन आघाडीवर असून द्रविड दुसऱ्या स्थानी आहे.

2012 मध्ये जेव्हा त्याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, तेव्हा अनेकजण म्हणत होते की द्रविडने भारतीय क्रिकेटसाठी आणखी काही योगदान दिले पाहिजे. आणि आज तो तेच काम करत असल्याचे दिसून येते. श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, शुभमन गिल, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत ही त्याचीच काही उदाहरणे. 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना त्याने तयार केलेली फळी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पडताना दिसत आहे. सध्या तो बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) चा डिरेक्टर म्हणून काम पाहत आहे. अनेक दर्जेदार खेळाडू त्याच्या हाताखाली तयार होत आहेत. 

- 'या' दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी पडद्यावर साकारणार झूलन गोस्वामी

द्रविड जितका महान खेळाडू आहे, तितकाच तो जमिनीवर पाय असणारा महान माणूसही आहे. एनसीए सारख्या देशातील अग्रगण्य संस्थेचा प्रमुख असताना गर्वाचा एक टक्के लवलेशही त्याला चिकटला नाही. किंवा त्याने चिकटू दिला नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शाळेत मुलाच्या ऍडमिशनसाठीची रांग असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तो सामान्य व्यक्तीसारखा रांगेत उभा राहिलेला अनेकांनी पहिला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियामधून व्हायरल झाले आहेत. तो भारतीय क्रिकेतसंघात खेळत होता तेव्हाही असाच होता, आताही असाच आहे. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने जंटलमन ऑफ क्रिकेट आहे. भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील त्याचे स्थान अढळ राहील, यात शंकाच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Indian cricketer Rahul Dravid celebrate 42 birthday