
Maharashtra Politics: "शिवसेनेतील बालाजी किणीकर म्हणतायत काहीही करून मला मातोश्रीवर न्या!"
गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. याची सुरवात झाली ते म्हणजे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केलं. शिवसेना फुटली. त्यामध्ये दोन गट निर्माण झाले. खरी शिवसेना कोणाची वाद निर्णय झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी भाजपसोबत जात राज्यात आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येतात.
अशातच शिवसेनेच्या फुटलेल्या ४० आमदारांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांची नाराजी नुकतीच व्यक्त केली. तेव्हापासून राजकीय चर्चांना उधाण आलं. कीर्तिकर म्हणाले, शिंदे गटातील खासदारांना भाजपाकडून समान वागणूक मिळत आहेत. त्यामुळे आता हळूहळू शिंदे गटातील इतर नेतेही आपली नाराजी व्यक्त करतील अशी चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (२८ मे) एका भाषणामध्य बोलताना 'शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार परतण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा केला आहे. आमदार बालाजी किणीकर मातोश्रीवर परतण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आज या मंचावरून सांगतो बालाजी किणीकर तुम्ही आता बॅग पॅक करा. तुम्हाला घरी जायचं आहे असं ते म्हणाले आहेत. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'मला माहिती आहे, मी या मंचावरून सांगत आहे, बालाजी किणीकर इकडे तिकडे बोलत फिरत आहेत की, मला काहीही करून कसंही करून मातोश्रीवर परत न्या. त्यामुळे आता बॅग पॅक करायला घ्या असं त्यांनी कार्यक्रमात म्हंटलं आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड?
विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर यांची नावं घेऊन सांगतो, बॅगा भरायला घ्या, तुम्हाला घरी जायचं आहे. बालाजी किणीकर आज जरी निवडणूक लढले तरी चाळीस हजार मतांनी हारतील असा दावा आव्हाड यांनी केला आहे. तर पुढे ते म्हणाले की, आज उघडपणे सांगतो की बालाजी किणीकर प्रयत्न करतायत की मला मातोश्रीवर घेऊन जा, आईच्या पायावर हात ठेवून सांगा की मी बोलतोय ते खोटं आहे. त्यांनी कुणाला सांगितलं, कोणाशी बोलले, हे सगळं मला माहित आहे. इतकी त्यांची अवस्था वाईट आहे असंही आव्हाड पुढे म्हणाले आहेत.