शरद पवारांनी सांगितलं, अजित पवार भाजपसोबत का गेले?

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • भाजपने मला राष्ट्रपतीपद किंवा इतर कोणतिही ऑफर दिली नाही 
  • पंतप्रधान मोदींनी मात्र, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
  • सुप्रिया सुळे यांना केंद्रात जबाबदारी देण्याची होती भाजपची तयारी 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. पण, अजित पवार यांनी एक रात्रीत हा निर्णय का घेतला?, असा प्रश्न महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशापुढं पडला होता. या प्रश्नाचं उत्तर, खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

'विश्वास होता, आपण हे मोडून काढू'
अजित पवार यांनी एकाएकी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? यावर शरद पवार यांनी जे घडलं ते मुलाखतीत स्पष्ट केलं. पवार म्हणाले, 'ज्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत माझा वाद झाला. हा वादा सत्ता स्थापनेशी संबंधित विषयावर नव्हता. तर, दुसऱ्या विषयावर होता. पण, अजित पवार यांना हे आवडलं नाही. 'हे आताच जर असं बोलत असतील तर, पुढं एकत्र काम कसं करायचं?', असा प्रश्न अजित पवार यांच्या मनात होता. त्यामुळं त्यांनी रात्रीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून, सगळा खटाटोप केला आणि सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मला सकाळी सुप्रियानं उठवलं. मला याची काहीच कल्पना नव्हती. पण, ते ऐकून मला धक्का बसला. पण, हा माझा निर्णय नाही, हे मला जनतेला सांगायचं होतं.'

आणखी वाचा : काँग्रेसच्या सभेत कार्यकर्ता म्हणाला, प्रियंका चोप्रा जिंदाबाद

म्हणून, 'अजित पवारांचा शपथविधी नाही'
पवार म्हणाले, 'अजित पवार यांचा निर्णय पाहिला तर, काही वेळातच मला खात्री झाली होती की हे आपण दुरुस्त करू शकतो. कुटुंबात या निर्णयामुळं कटूता आल्याचं सगळ्यांना वाटत होतं. त्यात सुप्रियानं थेट कुटुंब आणि पक्ष फुटल्याचं म्हटलं होतं. पण, ते होऊ द्यायचं नाही, हे मी ठरवलं होतं. मुळात कुटुंबात मतभेद असू शकतात. पण, पक्षात मतभेद होऊ द्यायचे नाहीत, हे मी ठरवलं होतं. ज्या वेळी अजितनं चूक मान्य केली. त्यावेळी तुला याची किंमत मोजावी लागेल, असं मी बजावलं होतं. अजित पवार यांना माफ करावं, अशी भूमिका सगळ्यांची होती. पण, एक मेसेज जावा यासाठी अजित पवार यांना पहिल्यांदा शपथ घेण्याची संधी देण्यात आली नाही.'

आणखी वाचा : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे!

शरद पवार काय म्हणाले?

  • भाजपने मला राष्ट्रपतीपद किंवा इतर कोणतिही ऑफर दिली नाही 
  • पंतप्रधान मोदींनी मात्र, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
  • सुप्रिया सुळे यांना केंद्रात जबाबदारी देण्याची होती भाजपची तयारी 
  • माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठीच ऐन वेळेला मला पंतप्रधानांनी वेळ दिली असावी 
  • सुप्रिया नाराज होती पण, अजितनं परत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदा सुप्रियाशीच संपर्क साधला 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar statement about ajit pawar special interview