...तर बाबरीनंतर दंगली उसळल्या नसत्या; शरद पवार यांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

ती चूकच झाली
राज्यपालांना वैधानिक विकास महामंडळाचे अधिकार देणे यालादेखील यशवंतराव शंकरराव चव्हाण यांचा विरोध असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री असताना विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी वैधानिक विकास महामंडळे स्थापन केली. याचे सर्वाधिकार राज्यपालांना दिले; पण हे अधिकार राज्यपालांना देणे हे घातक असल्याचे शंकरराव चव्हाण यांचे मत होते. आज विद्यमान राज्यपालांनी विधिमंडळाच्या राज्य सरकारला काही कठोर निर्देश दिल्याचे वाचनात आल्याचे शरद पवार म्हणाले. असे प्रकार पाहून वैधानिक विकास महामंडळाचे अधिकार राज्यपालांना देणे ही माझी चूक झाली हे मान्य करण्यात संकोच नाही अशी कबुली शरद पवार यांनी या वेळी दिली.

मुंबई - उत्तर प्रदेशात बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणी आज शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये बाबरी प्रकरणाची हाताळणी करण्यासाठी चार ज्येष्ठ मंत्र्यांची समिती स्थापन केली होती.

त्या समितीत शंकरराव चव्हाण गृहमंत्री म्हणून सदस्य होते. उत्तर प्रदेशामधील वातावरण पाहता तत्कालीन कल्याणसिंह सरकार बरखास्त करावे, अशी शंकररावांची सूचना होती. मात्र आम्ही ती सूचना मान्य केली नाही आणि त्यामुळे बाबरी प्रकरण घडले आणि त्यानंतर देशभरात धार्मिक कलह निर्माण झाला. अनेकांचे त्यामध्ये बळी गेले, जाळपोळ झाली. मुंबईसारखे शहरदेखील याला बळी पडले, अशी माहिती देत शंकरराव चव्हाण यांचे ऐकून कल्याणसिंह सरकार बरखास्त केले असते आणि उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था केंद्राच्या हातात घेतली असती, तर हा आगडोंब उसळला नसता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी आज विधान भवनातील कार्यक्रमात केला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील आणि रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधानभवनातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या वेळी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या चारही नेत्यांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील योगदान सांगताना शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शंकरराव चव्हाण हे शिस्तीचे नेते होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तरदेखील म्हटले जायचे. प्रत्येक गोष्टीचा सांगोपांग अभ्यास करून ते प्रशासनाचे निर्णय घेण्यात माहीर होते. अशाच प्रकारे बाबरी प्रकरणाच्या संदर्भात शंकरराव चव्हाण, मी स्वतः संरक्षणमंत्री,  माधव सिंह सोळंकी आणि अर्जुन सिंग यांची समिती स्थापन केली होती. तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले यांनी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात गंभीर चिंता व्यक्त करणारा अहवाल समितीला दिला होता. या अहवालानंतर शंकरराव चव्हाण यांनी कल्याणसिंह सरकार बरखास्त करूया अशी सूचना केली होती; पण कायदा व सुव्यवस्था हा राज्य सरकारचा अधिकार असल्याने हस्तक्षेप करायला नको, असा आम्हा तिघांचा समज होता.

महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण; पुण्यातीलच तीन जण वाढले!

पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी आमची भूमिका ऐकली आणि शंकरराव चव्हाण यांच्या सूचनेला विरोध केला. मात्र उत्तर प्रदेशातील सरकारने बाबरीप्रकरणी कायदा व सुव्यवस्था हाताळली नसल्याने बाबरी पाडण्यात आली आणि दंगली उसळल्या, असे पवार म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हे चारही नेते महाराष्ट्र उभा करणारे दीपस्तंभ असल्याचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि मधुकर भावे यांनी या नेत्यांच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar statement babri masjid riots shankarrao chavan