
शिवसेनेचाही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा
मुंबई : निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दुजाभाव करीत असल्याची जुनीच तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी केली. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुडापोटी आमची अडवणूक करून मतदारसंघातील शिवसेनाविरोधकांना बळ देत असल्याचा आरोपही केला. आमदार अनिल बाबर, शहाजी पवार, आशिष जैस्वाल, अनिल राठोड हे आमदार राष्ट्रवादी’च्या तक्रारी करण्यात आघाडीवर राहिले. या प्रकारामुळे काँग्रेसनंतर आता शिवसेनेच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आल्याचे दिसत आहे.
आमदारांच्या मागण्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. बैठकीला सुरवात होताच, आमदारांनी निधी वाटपाचा जुना मुद्दा काढला आणि त्यावर गाऱ्हाणे मांडले. ठाकरे यांनी सर्व आमदारांना बोलण्याची संधी दिली. ती साधून बाबर, पवार, जैस्वाल, राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेला कसे पाण्यात पाहतात, याची उदाहरणेच दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांचीही कामे लगेचच होतात. ग्रामविकास खात्याचा निधी त्यांना थेट दिला जातो. अर्थखातेही मागे नाही. त्यापलीकडे जुन्या मैत्रीतून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाणही ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांना मोकळ्या हाताने मदत करीत आहेत. पण शिवसेनेच्या आमदारांना चकरा माराव्या लागतात, अशा अनेक तक्रारी आमदारांनी ठाकरे यांच्या कानावर घातल्या. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच शिवसेनेचे आमदारही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः अजित पवार आणि मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रारी करू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे तूर्त मौन
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना तिप्पट निधी मिळाल्याचा मुद्दा काढून शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त निधी घेतला आहे; यापुढच्या अडीच वर्षांत शिवसेना आमदारांना अधिक निधी देतील का, याचे उत्तर आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तूर्त काही न बोलता, थेट ठाकरे पद्धतीने पावले उचलण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
सहाव्या उमेदवारीसाठीही शिवसेने आग्रही
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडे एक जागा निवडून येण्याची क्षमता असतानाही दुसऱ्या म्हणजे, सहाव्या जागेचाही आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. अपक्ष उभे राहणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे बोलले जात आहे. त्यात सहावा उमेदवार देण्याची घोषणाही शिवसेनेने केली. या मुद्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.
Web Title: Ncp Minister Distribution Of Funds Scam Shiv Sena Uddhav Thackeray Ajit Pawar Hassan Mushrif Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..