राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना शरद पवारांच्या सूचना; म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 January 2020

- मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे.

मुंबई : राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात  घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर पवार यांनी बुधवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांना मार्गदर्शन करताना पवारांनी राज्यासमोरील आव्हानांचा धांडोळा घेताना शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची सूचना केली. नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील कामकाज तसेच प्रशासकीय यंत्रणेची माहितीही पवार यांनी दिली.

- दोस्ती अन् कुस्ती : हर्षवर्धन-शैलेशच्या खिलाडूवृत्तीचा मेरी-झरीनने घ्यावा आदर्श!

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पवारांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली.

- पालकमंत्र्यांची यादी जाहीर; 'हे' आहेत पुण्याचे नवे पालकमंत्री

मंत्री म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या कामांना प्राधान्य द्यावे. पालकमंत्री हा सरकार आणि पक्षाचा चेहरा असतो. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा, अशी सूचना पवारांनी केल्याचे मलिक म्हणाले.

- नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

न्या. लोया मृत्यू प्रकरण

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पवार यांनी न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत कोणाची तक्रार असेल तर चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तेच सांगितले आहे. त्यामुळे न्या. लोयांच्या मृत्यूबाबत कोणाला संशय असेल किंवा तक्रार असेल, तर सरकार नक्की पावले उचलेल, असे मलिक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP president Sharad Pawar guided to NCP ministers in party meeting