"एक फोन जरी केला असता, तरी…", सुप्रिया सुळेंची संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया | New Parliament Building Inauguration | Supriya Sule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Supriya Sule On  New Parliament Building and not being invited by CM Eknath Shinde for Veer Savarkar Jayanti

New Parliament Building : "एक फोन जरी केला असता, तरी…", सुप्रिया सुळेंची संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया

New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे आज, २८ मे रोजी उद्घाटन करण्यात आले. यासोबत देशाला नवीन संसद भवन मिळालं. यादरम्यान इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर अनेक राजकीय पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र सरकारमधील नेत्यांकडून विरोधकांना एखादा फोन जरी केला गेला असता तरी सगळेजण आनंदाने कार्यक्रमाला गेले असते असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एरवी काम असलं की मंत्री नेत्यांना फोन करता की नाही? जेव्हा विधेयक मंजूर करायचं असतं, तेव्हा करता तसंच जर सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी देशीतील सर्व विरोधी पक्षांना एखादा फोन जरी केला असता तर सर्व राजी खुशी गेले असते.

संविधानानी देश चालतो असं जेव्हा म्हणतो आणि ही लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष असलाच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचा देखील यासाठी आग्रह होता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं मत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सावरकर जयंती कार्यक्रमाचेही निमंत्रण नाही

यादरम्यान आज दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील खासदारांच्या उपस्थितीतीत वीर सावरकर जयंती साजरी करत आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील काही खासदारांना निमंत्रण देण्यात आलं नाहीये. याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे.

आम्हाला याची सवय आहे. त्यांनी आम्हाला आमंत्रण पाठवलं नाही याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण हे दडपशाहीचं सरकार आहे. लोकशाहीचं सरकार राहीलं नाही असं त्यांच्या वागण्यामधून दिसून येत आहे असे सुप्रीया सुळे म्हणाल्या आहेत.