'नीट'मध्ये सावळा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

प्रश्‍नांसह चुकीचे पर्याय
'नीट'च्या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाचे तीन प्रश्‍न हे नियोजित अभ्यासक्रमाबाहेरील आणि भौतिकशास्त्र विषयातील दोन प्रश्‍नांसाठी दिलेले उत्तरांचे पर्याय हे चुकीचे असल्याचे 'नीट' परीक्षेसाठीच्या मार्गदर्शकांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या पाच प्रश्‍नांसाठीच्या एकूण 20 गुणांबाबत 'सीबीएसई' काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

पुणे : प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकलेला पत्ता, वेळेवर केंद्रावर पोचू न शकलेले परीक्षार्थी, प्रश्‍नपत्रिकेतील काही प्रश्‍नांमध्ये झालेल्या चुका आणि केंद्रावर आवश्‍यक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय, यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रविवारी झालेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) गोंधळ उडाल्याचे दिसून आले. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे येथील विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली 'नीट' परीक्षा देशभरातील एकूण 104 परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेला देशभरातून 11 लाख 35 हजार 104 विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी आठ लाख दोन हजार 594 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेतलेली ही परीक्षा राज्यातील पुण्यासह अमरावती, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, नांदेड, सातारा, कोल्हापूर, नगर अशा एकूण अकरा ठिकाणी घेण्यात आली. पुण्यात 'सीबीएसई'च्या शाळांची निवड परीक्षा केंद्र म्हणून करण्यात आली होती.

नाशिकमध्ये प्रवेशपत्रात चुका
नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी केंद्रावर हजेरी लावली होती. एकलव्य निवासी शाळेच्या केंद्रासंदर्भात प्रवेशपत्रावर 'मुंडेगाव' असा उल्लेख असल्याने सुमारे दीडशे पालकांनी मुंडेगाव (ता. इगतपुरी) गाठले. परंतु प्राचार्यांच्या प्रसंगावधानाने आणि पालकांच्या सतर्कतेतून विद्यार्थी नाशिक केंद्रावर वेळेत पोचले. सिडकोतील सिंबायोसिस शाळेत विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र काढण्याची सुविधा असल्याचे प्रवेशद्वारावर सांगण्यात आले. मात्र विद्यार्थी आत गेल्यावर अशी सुविधा नसून छायाचित्र बाहेरून काढून आणा, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर जाऊन छायाचित्र काढण्यासाठी धावपळ करावी लागली. केंद्रावरही आडमुठ्या धोरणामुळे जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले.

पुण्यात पालकांची दमछाक
शहरात विविध ठिकाणी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून येण्यास सुरवात केली होती. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर अशा विविध भागांतील विद्यार्थ्यांनी पुण्यातील परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. परीक्षेसंदर्भातील अटी आणि नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी न केल्याने पालकांना ऐनवेळी दमछाक करावी लागली. परीक्षा केंद्रावर वेळेत पोचू न शकल्याने काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. बहुतांश केंद्रांवर विद्यार्थ्यांना छायाचित्रे आणि प्रिंटआउट काढून दिले जात होते. कात्रज येथील सरहद संस्थेतील केंद्रावर कोमल दबडे ही विद्यार्थिनी दहा मिनिटे उशिरा आली, यामुळे तिलाही ही परीक्षा देता आली नाही. बिबवेवाडीत ओंकार कुलकर्णी या विद्यार्थ्यांला परीक्षेला बसण्यासाठी पूर्ण बाह्यांचा शर्ट अर्धबाह्यांचा करावा लागला.

साताऱ्यात सुरळीत
साताऱ्यात जवळपास दोन हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. जिल्ह्यातील चार केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. काही परीक्षार्थींना प्रवेश पत्र न आल्याने त्यांना संबंधित केंद्रांवर तत्काळ प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येत होते.

Web Title: neet exam fiasco