राज्यात नवीन 40 फार्मसी महाविद्यालये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये राज्यात सुरू करण्यासाठी संस्थाचालक सरसावले आहेत. यंदा तब्बल 40 नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) गेले आहेत. या महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यास राज्यात फार्मसीच्या तब्बल साडेचार हजार जागा वाढण्याची शक्‍यता आहे.

साडेचार हजार जागा वाढणार; "एआयसीटीई'ला प्रस्ताव
मुंबई - औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये राज्यात सुरू करण्यासाठी संस्थाचालक सरसावले आहेत. यंदा तब्बल 40 नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) गेले आहेत. या महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यास राज्यात फार्मसीच्या तब्बल साडेचार हजार जागा वाढण्याची शक्‍यता आहे.

एकेकाळी राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेव फुटले होते. विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्यामुळे संस्थाचालकांनी मोठ्या संख्येने अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली; परंतु काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल फार्मसीकडे वाढला आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी गेल्या वर्षीही अनेक फार्मसी महाविद्यालये सुरू केली. यंदाही संस्थाचालकांनी फार्मसी अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्याचे तब्बल 40 प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवले आहेत. नवीन महाविद्यालये "एआयसीटीई'च्या निकषांची पूर्तता करतात की नाही, याची पाहणी झाल्यानंतरच या महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल.

गेल्या वर्षी राज्यात डी. फार्म. अभ्यासक्रमाच्या 19 हजार 589 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी विनाअनुदानित महाविद्यालयांतील 37 आणि सरकारी अनुदानित महाविद्यालयांतील 16 अशा एकूण 55 जागा रिक्त राहिल्या होत्या.

अशी असेल प्रक्रिया
महाविद्यालयांच्या प्रस्तावावर "एआयसीटीई'ने नेमलेली समिती अहवाल सादर करेल. ही समिती महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृह, पुरेसे शिक्षक, "एआयसीटीई'च्या मानकानुसार जमीन, बांधकामाचे क्षेत्रफळ आदी माहिती घेईल. समितीच्या शिफारशीनुसार महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येईल. त्यानुसार या महाविद्यालयांचा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार आहे.

Web Title: New 40 Pharmacy College in State