आश्रमशाळांतील मृत्यू रोखण्यासाठी नवीन आराखडा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी राजभवन येथे उच्चस्तरीय बैठकीत घेतला.

मुंबई - राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी राजभवन येथे उच्चस्तरीय बैठकीत घेतला.

आश्रम शाळेतील मुलांच्या रात्रीच्या जेवणातील तसेच सकाळच्या न्याहारीमधील कालावधी कमी करण्यासंदर्भात साळुंके समितीच्या शिफारसीबाबत सरकारच्या वतीने आदिवासी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी राज्यपालांना सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून, या संदर्भात स्थायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर विविध विभागांमध्ये समन्वय तसेच सुसूत्रता असावी या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून लवकरच या संदर्भात सरकार निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती देवरा यांनी या वेळी दिली. सर्व आश्रमशाळांमध्ये 108 क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत सरकार स्तरावर विचार सुरू असून अशा सुविधेबाबत फलक आश्रमशाळांमध्ये दर्शनीय भागात लावण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केवळ आपत्कालीन सेवा न देता आरोग्य सेवाही पुरविण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे या वेळी सांगण्यात आले. डासांपासून होणारे आजार रोखण्यासाठी सर्व आश्रम शाळांमध्ये मच्छरदाण्या पुरविण्याबाबत आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचित करण्यात आले असून, बहुतेक आश्रमशाळांमध्ये मच्छरदाण्या बसविण्यात आल्या असल्याचे देवरा यांनी सांगितले.

बैठकीला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, कुटुंब कल्याण आयुक्त डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

- रात्रीचे जेवण व सकाळची न्याहारीतील कालावधी कमी
- महिला अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत आश्रमशाळांची तपासणी
- सर्व आश्रमशाळांमध्ये मच्छरदाण्या

Web Title: A new scheme to prevent death ashramsshala