उसाचे नवे फायदेशीर वाण विकसित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - कमी पाण्यावर चांगला साखर उतारा देणारे आणि हेक्‍टरी जास्त उत्पादन देणारे उसाचे नवीन वाण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) विकसित केले आहे. "व्हीएसआय 08005' ही उसाची नवीन जात देशपातळीवरील वेगवेगळ्या कृषी चाचण्यांमध्ये अग्रेसर ठरली आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

पुणे - कमी पाण्यावर चांगला साखर उतारा देणारे आणि हेक्‍टरी जास्त उत्पादन देणारे उसाचे नवीन वाण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) विकसित केले आहे. "व्हीएसआय 08005' ही उसाची नवीन जात देशपातळीवरील वेगवेगळ्या कृषी चाचण्यांमध्ये अग्रेसर ठरली आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, ""महाराष्ट्रात 12 ते 14 महिन्यांचे उसाचे पीक घेतले जाते. तिन्ही हंगामांमध्ये उत्पादनास योग्य असे हे वाण असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 86032 या जातीचा ऊस राज्यात सर्वत्र वापरला जातो. त्याला पर्याय शोधण्याचे आव्हान शास्त्रज्ञांपुढे होते. त्यामुळे या नव्याने विकसित केलेल्या जातीचे महत्त्व वाढले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये ही जात शेतकऱ्यांपर्यंत पोचेल.'' 

"व्हीएसआय'चे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे म्हणाले, ""अंबोली येथील ऊस प्रजनन केंद्रावर हे संशोधन करण्यात आले. "को 0310' या उसाच्या जातीची मादी आणि "को 86011' याचा नर यांच्या संकरातून "व्हीएसआय 08005' या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. 2008 पासून यावर संशोधन सुरू होते. दक्षिण भारतातील नऊ राज्यांत ऊस आणि साखरेच्या उताऱ्यात हे वाण अव्वल ठरले आहे, असे अखिल भारतीय समन्वयित ऊस संशोधन प्रकल्पाच्या अहवालात नमूद केले आहे. अंतिम-पूर्व-मध्य उशिरा पक्व होणाऱ्या चाचण्यांच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि "व्हीएसआय'ने घेतलेल्या दक्षिण, मध्य व उत्तर-पूर्व या तिन्ही विभागांत हा वाण आशादायक दिसला आहे.'' 
हे वाण कमी पाण्यावर येणारे असून, त्याला तुरा येत नाही. त्याचा साखर उतारा चांगला आहे. शेतकऱ्यांनाही यातून चांगले उत्पादन मिळत असल्याचे प्रयोगातून दिसून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
वाणाची वैशिष्ट्ये 
- पक्वता ः 12 ते 14 महिने 
- लागवड ः आडसाली, पूर्वहंगाम आणि सुरू 
- ऊस उत्पादन (टन/हेक्‍टर) ः 144.64 
- साखर उतारा (टन/हेक्‍टर) ः 21.93 
- रसातील शर्करा (टक्‍क्‍यांमध्ये) ः 20.71 

Web Title: new sugarcane varieties