महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु

assembly hall
assembly hall

मुंबई - आज (बुधवार) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची नवी पहाट झाली असून, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरवात झाली. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या अतिवेगवान राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनताही अवाक् झाली आहे.

 राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक संपल्यानंतर अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने मंगळवारी कोसळले. सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला.

तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आजच सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या. आज सकाळीच आठ वाजता सर्व आमदार विधानभवनात पोहचले. 

वांद्रे येथील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची संयुक्‍त बैठक पार पडली. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह इतर घटक पक्ष व अपक्ष आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला. तर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन देत उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. उद्धव यांनी बैठकीनंतर राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत राज्यपालांनी दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आज संविधान दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अभिनंदन करणारा ठरावदेखील संमत केला. याबाबतचा ठराव सुभाष देसाई यांनी मांडला व त्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे मी अभिनंदन करतो. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही स्वागत करतो. उद्धवजी ठाकरे या राज्याचे नेतृत्व करणार असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो, अशा भावना शिंदे यांनी ठराव मांडताना व्यक्‍त केल्या. या ठरावाला काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com