79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

Sharad Pawar
Sharad Pawar

महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही अशी टीका सहन कराव्या लागलेल्या या पैलवानाने आज दाखवून दिले आहे कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष कोण आहे. गेल्या काही दिवसांतील सत्तानाट्यातील घडामोडींवरून अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती कुस्तीत वस्ताद हा सगळेच डाव आपल्या शिष्यांना शिकवत नसतो. काही डाव राखून शिष्य घडवत असतो. आज शरद पवारांकडे पाहून या सगळ्या घडामोडींत वस्ताद कोण ठरलं हे सांगायला नाव घ्यायला नको. आता अजित पवारही पुन्हा घरी परतले आहेत, त्यामुळे या वस्तादाने कौटुंबिक प्रश्नही त्याच खुबीने सोडविला आहे.

राजकारणात 50 वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेले अन् सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये प्रदीर्घ घडामोडी पाहिलेल्या शरद पवार यांनी यंदाही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर ठेवून सोडवून दाखविला आहे. शरद पवारांचे राजकारण संपले, आता फडणवीसांच्या राजकारणाची वेगळी पद्धत पाहायला मिळेल असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेबाहेर ठेवून कोणाच्या स्वप्नातही येणार नाही अशी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकासआघाडी उदयास आणली आहे. तीन विचारांची टोके एकत्र आणण्यात आणि किमान समान कार्यक्रमावर एकमत करण्यात पवारांचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही. 

शरद पवार यांना भाजपकडून अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि अगदी आजकालच्या चंद्रकांत पाटलांसह सर्वांनीच लक्ष्य केले होते. फडणवीस तर ओरडून-ओरडून सांगत होते, की आम्ही तेल लावून तयार आहोत, पण आमच्यापुढे कोणी पैलवानच नाही. कोणाशी कुस्ती लढायची, विरोधी पक्ष पूर्णपणे हरला आहे. शरद पवारांचे राजकारण संपले आहे. आता त्यांच्यामागे कोणी नाही, ते एकटे पडले आहेत. पण, पवार या सर्व टीकांवर शांत राहिले. त्यांनी भाजपवर कधीही वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली नाही. त्यांची या वयातील मेहनत आणि सभांचा धडाका याच्या जीवावर ते लढत राहिले. अखेर त्यांना याचे फळ निकालातून पाहायला मिळाले. गेल्यावेळी अर्धशतकही न गाठणारी राष्ट्रवादी 54 पर्यंत गेली. येथेच त्यांनी भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव केला. याला साथ मिळाली ती भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादाची! शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या सरकारची संकल्पना समोर आली. आज आपण पाहत आहोत भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले अन् नवे सरकार स्थापन होत आहे.

निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी मोठे केलेल्या आणि विविध पदांवर काम करण्याची संधी दिलेल्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात नेण्यात भाजप आघाडीवर होती. भाजपने या नेत्यांना महाभरतीत सहभागी करून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक झटके दिले होते. पण, त्यावेळीही पवार शांत राहिले. याला उत्तर महाराष्ट्रातील जनताच देईल असे बोलत राहिले. अखेर जनतेने या बंडखोरांना त्यांची जागा दाखवून निवडणुकीत पराभूत केले आणि पुन्हा एकदा पवारसाहेबांवर विश्वास दाखविला. याचे जिवंत उदाहरण सांगता येईल ते साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याविरोधात जुने मित्र श्रीनिवास पाटील यांना संधी दिली. भर पावसात त्यांच्यासाठी सभा घेत उदयनराजेंना यापूर्वी संधी देऊन चूक केल्याचे विनम्रपणे कबूल केले. एवढा मोठा नेता आपली चूक कबूल करतो हे पाहून जनतेनेही त्यांना तेवढेच प्रेम दिले अन् उदयनराजेंचा अविश्वसनीय असा पराभव झाला. येथेही पुन्हा या 79 वर्षांच्या वस्तादाचाच विजय झाला.

आता अखेर सत्तास्थापनेच्या घडामोडीत अजित पवार यांनी घरातून बंड करून भाजपसोबत शपथ घेतली. पण, पवार येथेही खचून न जाता पक्ष अजित पवारांच्या पाठिशी नाही असे ठासून सांगत राहिले. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, हे सतत सांगत राहिल्याने पक्षातील एकाही आमदाराचे बंड करण्याचे धाडस झाले नाही. अजित पवारांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचेही धाडस दाखवून गेल्या तीन दिवसांपासून आपल्या आमदारांच्या संपर्कात राहिले. एवढेच काय तर त्यांची वैयक्तिक जबाबदारी घेतो असे बिनधास्तपणे सांगत राहिल्याने याचे फळ पक्षाला आणि शरद पवारांना मिळाल्याचे दिसत आहे. शरद पवार नावाच्या वस्तादाने आज टाकलेले डाव पाहून कोण-कोण आणि कशाप्रकार चितपट झाले आहेत, याचा विचार महाराष्ट्र अनेक दिवस करत राहील यात प्रश्नच नाही. त्यामुळे या वस्तादाला शड्डू ठोकून सलाम....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com