कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

राहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समारोपाच्या वेळी दोनदा भोवळ आली. नंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. विद्यापीठातच जेवण करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला आणि तेथून विमानाने नागपूरला रवाना झाले. दरम्यान, शिर्डी येथे साईदर्शन घेतल्यानंतर, "माझी प्रकृती उत्तम आहे,' असे गडकरी यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितले. 

राहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समारोपाच्या वेळी दोनदा भोवळ आली. नंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. विद्यापीठातच जेवण करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला आणि तेथून विमानाने नागपूरला रवाना झाले. दरम्यान, शिर्डी येथे साईदर्शन घेतल्यानंतर, "माझी प्रकृती उत्तम आहे,' असे गडकरी यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितले. 

कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात गडकरी यांचे सुमारे 25 मिनिटे भाषण झाले. त्यानंतर काही वेळांतच समारोपासाठी राष्ट्रगीत सुरू झाले. त्या वेळी गडकरी यांना अचानक भोवळ आली. ते खुर्चीवर कोसळले. त्यांच्या शेजारीच उभे असलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले आणि एक चॉकलेट खाण्यास दिले. 

चॉकलेट खाल्ल्यानंतर गडकरी सावरून पुन्हा उभे राहिले; मात्र लगेचच त्यांना पुन्हा भोवळ आली आणि ते खाली बसले. नगर जिल्हा रुग्णालयाच्या व विद्यापीठाच्या वैद्यकीय पथकाने गडकरी यांची तातडीने तपासणी केली. त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला होता. इंटेन्सिव्ह स्क्वॉडच्या डॉ. दर्शना धोंडे, डॉ. महिंद्र शेलार, डॉ. गणगोते यांनी प्रथमोपचार केले. साडेबारा वाजता लगेचच दीक्षान्त समारंभाचा पोशाख उतरवून, थोडा वेळ बसल्यानंतर गडकरी स्वत: चालत विद्यापीठाच्या मुख्य अतिथिगृहाकडे रवाना झाले. 

अतिथिगृहामध्ये सुमारे 30-40 मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी सर्वांसोबत जेवण घेतले आणि दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना झाले. 

नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एम. मुरब्बीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी "सकाळ'ला सांगितले, की गडकरी यांच्या रक्तातील साखर तपासली असता ती 248 भरली. ती प्रमाणापेक्षा अधिक होती. 

माझी तब्येत उत्तम - गडकरी 
शिर्डी ः ""बीपी नाही, शुगर नाही. थोडा ऑक्‍सिजन कमी पडला. बाकी काही नाही. माझी तब्येत उत्तम आहे. काळजीचे कारण नाही. तुमच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे...'' अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी आपल्या प्रकृतीची माहिती येथे पत्रकार परिषदेत दिली. 

गडकरी दुपारी दोनच्या सुमारास साईमंदिर परिसरात आले. मंदिरात जाऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. नंतर संस्थानाच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. "कृषी विद्यापीठातील सभागृह बंदिस्त असल्यामुळे आणि दीक्षान्त सोहळ्याचा पोशाख घातल्यामुळे प्राणवायू कमी पडल्याने मला भोवळ आली,' असे कारण त्यांनी सांगितले.

Web Title: Nitin Gadkari had a dizziness during the program of Agriculture University