सुप्रिया सुळे यांना त्रास देणाऱ्या टॅक्सीचालकाला नांदगावकर यांनी शिकवला धडा

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे स्थानकावर त्रास देणाऱ्या टॅक्सीचालकाने अखेर माफी मागितली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे स्थानकावर त्रास देणाऱ्या टॅक्सीचालकाने अखेर माफी मागितली आहे. मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी संबंधित चालकाला धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार एका फेसबुक व्हिडिओद्वारे कुलजितसिंग मल्होत्रा नामक या चालकाने आपल्या कृत्याची कबुली दिली आणि माफीही मागितली.

सुप्रिया सुळे या 12 सप्टेंबरला दादर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर हा चालक त्यांना टॅक्सीत बसण्यासाठी आग्रह करत लागला. तो थेट डब्यातच घुसला होता. त्याला नकार दिल्यानंतरही त्याने पाठलाग केला. तसेच त्यांचा रस्ताही अडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने वैतागलेल्या सुळे यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे ट्विटद्वारे तक्रार केली. तसेच महिलांची सुरक्षा यामुळे धोक्यात आल्याचा इशारा दिला. टॅक्सीवाले थेट स्थानकात येतातच कसे, असाही सवाल त्यामुळे उपस्थित झाला.

नितीन नांदगावकर यांनी अशा चालकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्या चालकाला आज हजर करून त्याने माफी मागितली. इतर चालकांनाही प्रवाशांना न अडविण्याचा इशारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Nandgaonkar taken Action against taxi driver who misbehave with Supriya Sule