ना ‘ईडी’ ना ‘आयटी’ची भीती! सोलापुरातील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदेंची विरोधकांना धास्ती

भाजपवर टीका केल्यास आपल्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागेल, या भीतीने अनेकांनी पक्षांतर केले असून काहीजण पक्षांतराच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आमदार प्रणिती शिंदे मोदी व शिंदे-फडणवीस सरकारवर बेधडक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
प्रणिती शिंदें
प्रणिती शिंदेंsakal

सोलापूर : राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपवर टीका केल्यास आपल्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागेल, या भीतीने अनेकांनी पक्षांतर केले असून काहीजण पक्षांतराच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले, जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले, एकरकमी एफआरपी मिळेना, कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय, असे अनेक प्रश्न असतानाही जिल्ह्यातील भाजप विरोधक गप्पच आहेत, हे विशेष. मात्र, अशा परिस्थितीत देखील कशाचीही भीती न बाळगता जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर बेधडक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आंदोलनाच्या माध्यमातून त्या नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, बार्शी, अक्कलकोट हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ या मतदारसंघात राष्ट्रवादीचे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आणि करमाळ्यात अपक्ष आमदार संजय शिंदे हे नेतृत्व करीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांची ताकद जास्त तोच पक्ष विधानसभा निवडणुकीत सरस ठरेल, असे समीकरण घातले जाते. काही महिन्यांत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत.

मात्र, मागील एक वर्षापासून जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिकांवर प्रशासकराज आहे. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रभाग रचनेचा वाद न्यायप्रविष्ट आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर जनआंदोलनाची गरज असतानाही भाजप विरोधक गप्पच असल्याचे चित्र आहे.

पण, अशावेळी आमदार प्रणिती शिंदे या बेधडक बोलल्या. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने जिल्ह्यात पहिल्यांदा शहर काँग्रेसने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. शहरातील प्रभागनिहाय ‘हात से हात जोडो’ अभियानात देखील आमदार शिंदे या मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे त्यांचे कट्टर समर्थक पक्ष सोडून जात असतानाही त्या सध्या सोबत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर एकट्या काँग्रेसतर्फे खिंड लढवत आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये लक्ष द्यायलाच हवे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा लोकसभेला दोनदा पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून अलिप्त झाले. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी पडली. पण, माजी आमदार दिलीप माने, महेश कोठे, ॲड. यु. एन. बेरिया, श्रीदेवी फुलारी यांच्यासह अनेकांनी साथ सोडली.

अशावेळी महापालिकेवरील सत्ता काबीज करणे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तरीपण, आता त्यांना राज्य व देशाच्या राजकारणात स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी ग्रामीण भागातही लक्ष द्यावे लागेल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गावागावात जात नसल्याने संघटना विस्कळित झाले आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी विरोधकांच्या संपर्कात जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता प्रणिती शिंदेंना ग्रामीणमध्ये देखील दौरे करावे लागणार आहेत.

लोकसभेला प्रणिती शिंदेंचेच पारडे जड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत अच्छे दिन व विकासाचे स्वप्न दाखवत केंद्राची सत्ता काबीज केली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत देखील केंद्रात मोदी सरकार कायम राहिले. २०१४ च्या मोदी लाटेत ॲड. शरद बनसोडे, २०१९ च्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना खासदारकीची संधी मिळाली. आता २०२३ च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवार कोण, असणार हे अनिश्चित आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आग्रही असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेत देखील ‘शहर मध्य’मधून विरोधकांचा चक्रव्यूह भेदून आमदारकीची हॅटट्रिक केली. त्यामुळे त्यांना सोलापूर लोकसभा निवडणूक अधिक सोपी असेल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com