
सन्मान निधी योजनेची राज्याची सद्यःस्थिती
सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली.
आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे.
- जयंत टेकाळे, उपायुक्त, कृषी, मुंबई