Vidhan Sabha 2019 : पहिल्या यादीतून खडसे, तावडेंना डावलले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. 

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. 

Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार

मुक्ताईनगर मतदारसंघातून 1990 पासून खडसे सलग सहा वेळा निवडून आले. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे महसूलसह अनेक प्रमुख खाती सोपविण्यात आली होती. मात्र, फडणवीस आणि त्यांच्यात वाद वाढत गेला. भोसरी येथील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पक्षात पुनर्वसनाची मागणी अनेकदा केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना बाजूलाच ठेवले. त्यांच्या सुनेला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्या खासदार झाल्या. 

Vidhan Sabha 2019 : भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात खडसे यांनी भाजप वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना पक्षाकडून महत्त्व देण्यात येत आला. आता खडसे यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीतून डावलल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसण्याची शक्‍यता आहे. खडसे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no name of eknath khadse in bjp fisrt list of candidates Maharashtra vidhansabha 2019