
शाळा सुरु होऊनही मिळाला नाही विद्यार्थ्याला गणवेश! ‘पीएफएमएस’ प्रणालीची डोकेदुखी
सोलापूर : हातावरील पोट असलेल्या पालकांच्या पहिली ते आठवीतील मुलांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश दिले जातात. राज्यातील जवळपास ३६ लाख गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राज्य सरकारने २१५ कोटी ५७ लाखांचा निधी दिला. पण, पीएफएमएस (पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीतून शाळा व्यवस्थापन समित्यांना निधी वितरीत करण्याची अट घालण्यात आली. त्या प्रणालीतून पैसे पाठविण्यास बॅंकांना अडचणी येत असल्याने शाळा सुरु होऊन २० दिवस झाले, तरीपण राज्यातील एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नाही.
हेही वाचा: दुबार अन् उशिरा पेरणीचे संकट! ५० टक्क्यांपेक्षा कमी खरीपातील पेरण्या
शासनाकडून समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत गणवेश योजनेतून दरवर्षी पहिली ते आठवीतील सर्व मुलींसह अनुसूचित जाती-जमातीतील मुले, दारिद्रय रेषेखालील मुलांना प्रत्येक दोन गणवेश दिले जातात. एका गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेश दिले जातात. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. आता १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यानंतर निकषांनुसार पात्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, असे शासनस्तरावरून आदेश होते. त्यासाठी सरकारने २५ एप्रिल २०२२ रोजी राज्यातील ३५ लाख ९२ हजार ९२१ विद्यार्थ्यांसाठी २१५ कोटी ५७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हास्तरावर निधी वितरीत झाल्यानंतर ३० दिवसांत प्रत्येक शाळांमधील शाळा व्यवस्थान समितीच्या खात्यात ही रक्कम वर्ग करावी, असे आदेशही सरकारने दिले. त्यानुसार तालुका स्तरावरील सर्व शिक्षा अभियानाच्या बॅंक खात्यावर ती रक्कम वर्ग झाली. पण, तेथून पुढे हा निधी गेलाच नाही. नवीन प्रणालीमुळे पैसे पाठविण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने बॅंकांनी हातवर केले आहेत. त्यामुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याला शासनाचा गणवेश मिळाला नाही. आता तेच गरजू विद्यार्थी बिगरगणवेशाचे शाळेत येत असल्याची स्थिती आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा: शिंदे-फडणवीस सरकारच्या वाटाघाटी! शिंदे गटाला नकोय ऊर्जा, कृषी, ओबीसी, परिवहन
शिक्षण परिषदेकडे मागविले मार्गदर्शन
गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समित्याना ऑनलाइन पाठविण्यासाठी शासनाने यंदा प्रथमच ‘पीएमएमएस’ प्रणाली लागू केली. पण, बॅंकांमध्ये या प्रणालीतून पैसे पाठविण्याची सोयच नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शाळा व्यवस्थापन समित्यांपर्यंत गणवेशाची रक्कम पोहचलेले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप त्यांच्याकडून मार्गदर्शन आलेले नाही.
हेही वाचा: ३२ माजी नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार; काँग्रेस, शिवसेना, MIMला पडणार खिंडार
गणवेशाची सद्यस्थिती
एकूण विद्यार्थी
३,९२,९२१
गणवेशासाठी मिळालेला निधी
२१५.५७ कोटी
गणवेश मिळालेले विद्यार्थी
००००
हेही वाचा: विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अंकगणित जमेना! गुणवत्तावाढीसाठी आता ‘सेतू’चा आधार
Web Title: No Student Got Uniform Even After School Started Pfms System
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..