
सोलापूर : राज्यातील सत्ता बदलानंतर आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला सत्तेसाठी ताण काढावा लागणार आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून, त्याचे नेतृत्व महेश कोठे यांच्याकडे सोपविले आहे. काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे या सर्वांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तब्बल ३२ माजी नगरसेवक निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती घालतील, असा दावा त्या नेत्यांनी केला आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळेल, यादृष्टीने नियोजन सुरू होते. पण, ओबीसी आरक्षण, पावसाळा अशा कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता राज्यात सत्तांतर झाले आणि सर्वच पक्षांनी स्वबळाच्या दृष्टीने नियोजन सुरू केले. आता महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षांतील नाराजांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आता महाविकास आघाडी नसल्याने राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेनेतील नाराज भाजपमध्ये जाणार नाहीत, याची दक्षता घेत त्यांना आपल्याच पक्षात ऑफर दिली आहे. दरम्यान, नवीन उमेदवार शोधून त्यांना निवडून आणण्यासाठी ताण काढण्यापेक्षा यापूर्वीच्याच माजी नगरसेवकांना उमेदवारी दिल्यास ते सहजपणे विजयी होऊ शकतात, या हेतूने ‘त्या’ ३२ माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांची नावे फायनल केली आहेत. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थिती पाहून त्यातील कितीजण आपल्या नेत्यासोबत पक्षांतर करतील, हे त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.
महेश कोठेंचे समर्थक माजी नगरसेवक
अमोल शिंदे, मनोज शेजवाल, प्रथमेश कोठे, देवेंद्र कोठे, विठ्ठल कोटा, मीरा गुर्रम, सावित्री सामल, कुमुद अंकाराम, सारिका पिसे, विनायक कोंड्याल, उमेश गायकवाड, विष्णू बरगंडे, शशिकांत केंची हे महेश कोठे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
चंदनशिवे अन् तौफिक शेख यांचे समर्थक
गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, शाजिया शेख, वाहिदाबी शेख, तस्लिम शेख हे आनंद चंदनशिवे व तौफिक शेख यांच्यासोबत पक्षांतर करतील, असा विश्वास त्यांना आहे.
काँग्रेसचे आठ माजी नगरसेवक पक्षांतराच्या उंबरठ्यावर
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल व माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करीत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढावी, महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता यावी म्हणून ते काँग्रेसमधील नाराज आठ माजी नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणणार आहेत. निश्चितपणे तेवढे माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, पण त्यांची नावे आताच जाहीर केली जाणार नाहीत, असे ॲड. बेरिया यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस सोडणारे ते माजी नगरसेवक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.