खरेदी केलेल्या तूर, हरभऱ्याला नाही गोदामे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

हमीदराने खरेदी केलेल्या 41 हजार 900 क्‍विंटल तुरीसह 22 हजार 47 क्‍विंटल हरभऱ्याला साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतमाल संबंधित केंद्रांवर पडून आहे.

लातूर : हमीदराने खरेदी केलेल्या 41 हजार 900 क्‍विंटल तुरीसह 22 हजार 47 क्‍विंटल हरभऱ्याला साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतमाल संबंधित केंद्रांवर पडून आहे. गोदामांमध्ये माल साठविला जात नाही तोपर्यंत त्याचा मोबदला देण्याविषयीची हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांनाही आपल्या विकलेल्या मालाचे चुकारे मिळण्यात विलंब होणार आहे. 

लातूर जिल्ह्यात यंदा तुरीची हमीदराने खरेदी करण्यासाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली. या दहाही केंद्रांच्या माध्यमातून दोन मेअखेरपर्यंत 14 हजार 385 शेतकऱ्यांची एक लाख 59 हजार 132 क्‍विंटल 26 किलो तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली. या तुरीची खरेदी किंमत जवळपास 86 कोटी 72 लाख 70 हजार रुपयांच्या घरात जाते. खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी एक लाख 17 हजार 231 क्‍विंटल तुरीलाच साठविण्यासाठी आजवर गोदामात जागा मिळाली आहे, तर 41 हजार 900 क्‍विंटल तूर अजूनही गोदामांमध्ये साठविणे बाकी आहे. 

त्यामुळे चुकारे मिळण्याच्या अडचणी कायम आहेत. दुसरीकडे हरभऱ्याच्या हमी दराने खरेदीसाठी लातूर जिल्ह्यात 13 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्यापैकी जळकोट व निलंगावगळता बारा केंद्रांवरून आजवर 22 हजार 984 क्‍विंटल हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली. या हरभऱ्याला साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच न मिळाल्याने हरभऱ्याच्या विक्रीपोटी शेतकऱ्यांनाही मोबदला मिळणे बाकी आहे. 

1 लाख 59 हजार 132 क्‍विंटल 
तुरीची हमीदराने खरेदी 

1 लाख 17 हजार 231 क्‍विंटल 
तूर गोदामात 

22 हजार 984 क्‍विंटल 
हरभऱ्याची हमीदराने खरेदी 

Web Title: No worries no warehouses for buyers