विनापरवाना कीटकनाशक विक्री केल्यास खबरदार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - राज्यात गेल्या खरीप हंगामात कीटकनाशकाची हाताळणी करताना विषबाधेने जीवितहानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कृषी आयुक्‍तालय खडबडून जागे झाले आहे. विनापरवाना कीटकनाशकांचा पुरवठा अथवा विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित उत्पादक, वितरक आणि विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे - राज्यात गेल्या खरीप हंगामात कीटकनाशकाची हाताळणी करताना विषबाधेने जीवितहानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कृषी आयुक्‍तालय खडबडून जागे झाले आहे. विनापरवाना कीटकनाशकांचा पुरवठा अथवा विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित उत्पादक, वितरक आणि विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या हंगामात राज्यात यवतमाळसह काही जिल्ह्यांत शेतकरी आणि शेतमजुरांचा कीटकनाशकांच्या विषबाधेने मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची हाताळणी काळजीपूर्वक करावी, यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. कीटकनाशक उत्पादक आणि विक्रेत्यांच्या नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांना गुणवत्तापूर्ण कीटकनाशकांचाच पुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. कीटकनाशक उत्पादकांनी विक्रेत्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे राज्यस्तरीय परवाना अधिकारी तथा कृषी संचालक (गुणवत्ता व नियंत्रण विभाग) यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी. शेतकऱ्यांनीही नोंदणीकृत आणि शिफारस करण्यात आलेल्या कीटकनाशकांचाच वापर करावा, असे आवाहन कृषी संचालकांनी केले आहे.

गतवर्षी केलेली कार्यवाही
- सहा कंपन्यांचे परवाने रद्द, तीन परवाने निलंबित
- राज्यातील 116 विक्रेत्यांचे परवाने रद्द, तर 386 परवाने निलंबित
- कीटकनाशकांच्या अनधिकृत साठ्याच्या विक्रीवर बंदी
- तीन कोटी 88 लाख रुपयांचा 102 टन कीटकनाशकांचा साठा जप्त
- 243 उत्पादक आणि विक्रेत्यांवर न्यायालयात प्रकरणे दाखल

कीटकनाशक उत्पादक, विक्रेत्यांना सूचना
परवानगी दिलेल्या कीटकनाशकांचाच वापर करा
परवान्यात समाविष्ट असलेल्या कीटकनाशकांचीच विक्री करावी
उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

शेतकऱ्यांनी घ्यायची खबरदारी
- कीटकनाशकांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी
- किडींचे प्रमाण नुकसान पातळीच्या वर गेल्यानंतरच कीटकनाशकाची फवारणी करावी
- कोणती कीटकनाशके, कोणत्या पिकासाठी आणि किडीसाठी फवारावीत याची माहिती पॅकिंगवर
- शिफारशीपेक्षा जास्त फवारणी करू नये
- कीटकनाशक विषारी असल्यामुळे हाताळणी काळजीपूर्वक करावी
- अनावश्‍यक कीटकनाशकांच्या खरेदीचा आग्रह केल्यास कृषी अधिकाऱ्यास माहिती द्यावी

Web Title: Non-licensed pesticide sales warning crime